…तर ‘त्या’ आमदारांना हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही; सरकारने घेतलाय हा मोठा निर्णय

मुंबई : देशावरील कोरोना महामारीचे सावट अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे येत्या १४ आणि १५ डिसेंबर  पासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे. यासाठी १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतले जाणार आहे.

यासंदर्भात विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

या अधिवेशनासाठी येणार्‍या राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना विधानभवनात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. .

ज्यांना शासनमान्य खासगी प्रयोगशाळेत तपासणी करावयाची आहे, त्यांनी अधिवेशनाला येताना आपला अहवाल १२ आणि १३ तारखेचाच असला पाहिजे याची  नोंद घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.