बाष्कळ बडबड बंद करा, कृषी कायद्यांबाबतचा अभ्यास असेल तर बोला, भाई जगतापांची केंद्र सरकारवर टीका

कृषी कायद्यांबाबत जर अभ्यास केला असेल, तर हा अभ्यास केंद्र सरकार लोकांपुढे का ठेवत नाही, असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. सरकारने हा अभ्यास लोकांसमोर ठेवावा आणि जर अभ्यास केला नसेल, तर तसे स्पष्टपणे सांगावे, अशी टीका भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर केली आहे. मुद्द्यांवर न बोलता, केवळ हे हिताचे, ते हिताचे अशी मोघम वक्तव्ये करणं बंद करावे, असेदेखील भाई जगताप यांनी म्हटले आहे.

केंद्रीय कृषी कायद्यांवरून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कृषी कायद्यांमुळे होणाऱ्या फायद्यांबाबत केंद्र सरकारने अभ्यास केला असेल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती कशी सुधारेल, किती सुधारेल, याची माहिती देखील केंद्र सरकारकडे द्यावी, असं त्यांनी म्हटलंय.

कृषी कायद्यांबाबत जर अभ्यास केला असेल, तर हा अभ्यास केंद्र सरकार लोकांपुढे का ठेवत नाही, असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. सरकारने हा अभ्यास लोकांसमोर ठेवावा आणि जर अभ्यास केला नसेल, तर तसे स्पष्टपणे सांगावे, अशी टीका भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर केली आहे. मुद्द्यांवर न बोलता, केवळ हे हिताचे, ते हिताचे अशी मोघम वक्तव्ये करणं बंद करावे, असेदेखील भाई जगताप यांनी म्हटले आहे.

यापूर्वीदेखील भाई जगताप यांनी शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका केली होती. १५ जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनानिमित्त ट्विटरवरून केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी काळे कायदे केले, त्याविरोधात लाखो अन्नदाते दिल्लीच्या सीमांवर थंडी आणि पावसात मुक्काम ठोकून आहेत. या आंदोलनादरम्यान साठपेक्षा अधिक अन्नदात्यांनी आपले प्राण दिले. मात्र तरीही अहंकारी मोदी सरकारला त्याचे काहीही घेणेदेणे नाही, अशी टीका जगताप यांनी केली होती.

कृषी आंदोलनांवर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने, सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला पुढे काय दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.