२ परिचारिकांना बळीचा बकरा बनवले; चित्रा वाघ यांचा आरोप

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

    मुंबई (Mumbai).  भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. अग्निशमन यंत्रणा चालत नव्हती, या बाबीला प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन परिचारिकांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली.

    घटनेच्या सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिचारिकांच्या निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. या कारवाईविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    दोन परिचारिकांवर गुन्हा दाखल झाल्यावर इतर सर्वांनी स्वत:चा बचाव केला. आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती. मग त्या परिचारिकांचा यात काय दोष आहे? आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी आग लागेपर्यंत झोपले होते का? हे तर 'अंधेर नगरी आणि चौपट राजा'सारखे काम आहे आणि सरकार संवेदनाहीन झाले आहे. -- चित्रा वाघ, भाजपा नेत्या

    दोष तर प्रशासनाचा
    घटनेच्या दिवशी आम्ही सर्व बालकांना फीडिंग झाल्यानंतर रेकॉर्ड भरण्याचे काम करीत होतो. हे काम करण्यासाठी केअर युनिटच्या बाहेर व्यवस्था करण्यात आली असल्याने आम्ही बाहेर बसून रेकॉर्ड भरण्याचे काम करीत होतो. अचानक आवाज आल्यानंतर आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र धुरामुळे आत जाणे शक्य झाले नसल्याने आम्ही मुलांना वाचवू शकलो नाही. मात्र, आम्ही त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या बिल्डिंगमध्ये फायर अलार्म आणि फायर एक्झिट असते तर, या मुलांना नक्कीच वाचविता आले असते. त्यामुळे हा दोष आमचा नसून शासनाने इमारत बांधल्यानंतर जी यंत्रणा उभारायला हवी होती, ती न उभारल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे ही चूक प्रशासनाची आहे, असे गुन्हा दाखल झालेल्या परिचारिकेने सांगितले.