प्रशासक सहस्त्रबुद्धेंना अटक करणार नाही; मुंबई पोलिसांकडून उच्च न्यायालयाला आश्वासन

ड्रीम्स मॉलमध्ये 25 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागलेल्या आगीत मॉलमधील सनराइज रुग्णालयातील अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनसीएलटीकडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धे यांनी मागील आठवड्यात अटक होण्याच्या भितीपोटी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली.

  मुंबई : मार्च महिन्यात मुंबईतील भांडुप परिसरातील ड्रीम्स मॉलमधील सनराईज कोविड सेंटरला आग लागली होती. या प्रकरणी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादा(एनसीएलटी) कडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धे यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नाही, असे आश्वासन मंगळवारी मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दिले.

  ड्रीम्स मॉलमध्ये 25 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागलेल्या आगीत मॉलमधील सनराइज रुग्णालयातील अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनसीएलटीकडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धे यांनी मागील आठवड्यात अटक होण्याच्या भितीपोटी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली.

  तेव्हा, सहस्त्रबुद्धे यांना पोलिसांसमोर हजर राहण्यासंदर्भात पोलिसांकडून पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच त्यांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले असून कर्तव्य बजाविण्यातही अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे सनराईज रुग्णालयाने पोलिसांना पत्र लिहून सांगितले असल्याचे सहस्त्रबुद्धे यांच्यावतीने जे. एस. किणी यांनी खंडपीठाला सांगितले. मुळात सहस्त्रबुद्धे यांना एनसीएलटीकडून नियुक्त करण्यात आले आहे.

  तसेच त्यांनी अनेकदा एनसीएलटी, पोलिस प्रशासन, अग्निशमन दलाला सदर मॉल आणि रुग्णालय प्रशासनाने अग्निशमन दलाने दिलेल्या प्रोटोकॉल आणि सुरक्षा प्रक्रियेच्या नियमांचे पालन न केल्याबाबत पत्र व्यवहारकरून कळविले असल्याचेही अँड. किणी यांनी खंडपीठाला सांगितले.

  तर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सहस्रबुद्धे यांना अद्याप आरोपी केलेले नाही. याप्रकरणी ड्रिम मॉलचे आणि व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्ती यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अशी बाजू पोलिसांच्यावतीने अँड. अरुणा पै यांनी मांडली. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने सुनावणी ७ एप्रिलपर्यंत तहकूब केली. तोपर्यंत सहस्त्रबुद्धे यांना अटक करणार नाही असे आश्वासन पै यांनी न्यायालयाला दिले.

  मॉलचे संचालक, प्रशासकिय अधिकारी आणि प्रशासक यांनी मॉलमध्ये आणि सनराईज रुग्णालयात सुरक्षेच्या उपाययोजना, सुरक्षेच्या परवान्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत आहे की नाही, याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी जाणीवपूर्वक सदर खबरदारी घेतली नसल्याने यात ११ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला असल्याचे सदर दुर्घटनेची प्राथमिक चौकशी करताना माहिती समोर आली होती.