भावना गवळींची ईडी चौकशीला दांडी; हजेरीसाठी मागितला 15 दिवसांचा वेळ

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी(Bhavana Gawali) यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्या ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नाहीत. संध्याकाळच्या सुमारास गवळी यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला. तशी मागणी त्यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली.

    मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी(Bhavana Gawali) यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्या ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नाहीत. संध्याकाळच्या सुमारास गवळी यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला. तशी मागणी त्यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली.

    गवळी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, गवळी यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी आपल्याला 15 दिवसांचा वेळ देण्यात यावा अशी मागणी गवळी यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली आहे. समन्स वेळेवर न मिळाल्याचे कारण सांगत त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला. 15 दिवसांनी चौकशीला हजर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

    गवळींनी चौकशीला पाठ दाखविल्यामुळे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या खासदार गवळी मुंबईतील ईडी कार्यालयात 100 कोटीच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. त्याऐवजी त्या अडसूळ हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख गायब होतात. ठाकरे सरकारचे मंत्री आणि नेते घोटाळा केल्यानंतर चौकशीला का सामोरे जात नाहीत? असा सवाल सोमय्या यांनी केला.