रीचर्डसन आणि क्रुडास कंपनीच्या परिसरात महापालिकेचे १ हजार बेडच्या क्षमतेचे ”जंबो फॅसिलिटी” कोविड उपचार केंद्र

मुंबई: कोरोनाबाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली

मुंबई: कोरोनाबाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी ‘जंबो फॅसिलिटी’ अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत आता भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. महापालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त आयुक्त (शहर)  संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात येत असलेल्या या तब्बल १ हजार खाटांची क्षमता असलेल्या उपचार केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे उपचार केंद्र जून महिन्याच्या अखेरीस रुग्ण सेवेत दाखल होईल, अशी माहिती ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना शरीरातील प्राणवायूच्या पातळीची अर्थात ‘ऑक्सिजन लेव्हल’ची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी असणाऱ्या १ हजार खाटांपैकी ३०० खाटा या ‘ऑक्सीजन बेड’ असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस आणि १५० परिचर व इतर वैद्यकीय कर्मचारी; असे एकूण ३०० कर्मचारी दिवसाचे अव्याहतपणे कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त  संजीव जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनात व ‘परिमंडळ १’चे उपायुक्त हर्षद काळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात असून या महिना अखेरीस हे ‘जम्बो फॅसिलिटी’ उपचार केंद्र कार्यान्वित होईल. या उपचार केंद्राच्या उभारणीच्या अनुषंगाने वैद्यकीय विषयक बाबींचे नियोजन करण्याची जबाबदारी ‘परिमंडळ १’ चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद आष्टेकर आणि ‘इ’ विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर निपा मेहता यांनी सांभाळली, अशीही माहिती यानिमित्ताने दगडखैर यांनी दिली आहे.

तब्बल १ हजार खाटांचे हे तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केंद्र उभारण्यास दिनांक १० जून २०२० रोजी सुरुवात झाली. त्यानंतर अक्षरश: दिवस-रात्र पद्धतीने उपचार केंद्राची उभारणी सुरू असून महापालिकेचे अनेक अभियंते – कामगार – कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस राबत आहेत. या महिना अखेरीस हे उपचार केंद्र रूग्णात सेवेत दाखल होणार असल्याने केवळ १५ ते २० दिवसात या उपचार केंद्राची उभारणी करण्यात येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुंबईतील व मुंबईलगतच्या परीसरातील महत्त्वाच्या बाजारपेठा सध्या नियंत्रित स्वरूपात सुरू असल्याने हे उपचार केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून घेण्यात अनंत अडचणी आल्या. मात्र पालिकेच्या अभियंत्यांनी त्या अडचणींवर मात करत हे उपचार केंद्र उभारण्याच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही. यामध्ये प्रामुख्याने पालिकेच्या ‘इ’ विभागातील परिरक्षण खात्यातील सहाय्यक अभियंता अक्षय जगताप, दुय्यम अभियंता पूजा तावडे यांच्या अथक मेहनतीचा उल्लेख करत सहाय्यक आयुक्त दगडखैर यांनी सर्व संबंधित कामगार – कर्मचारी अभियंत्यांच्या अविरत परिश्रमांचाही आवर्जून उल्लेख केला आहे.