स्टॅन स्वामी साठी डॉक्टरांचे पॅनल नेमा; उच्च न्यायालयाचे तळोजा तुरुंग अधीक्षकांना आदेश

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या स्टॅन स्वामी यांना वैद्यकीय तपासणी उद्या (गुरुवारी) जेजे रुग्णालयात घेऊन जावे तसेच त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पॅनल नेमण्यात यावे असे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने तळोजा कारागृह अधीक्षकांना दिले.

    मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या स्टॅन स्वामी यांना वैद्यकीय तपासणी उद्या (गुरुवारी) जेजे रुग्णालयात घेऊन जावे तसेच त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पॅनल नेमण्यात यावे असे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने तळोजा कारागृह अधीक्षकांना दिले.

    भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले ८४ वर्षीय स्टॅन स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार आहे. स्टॅन स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्द्यावर एनआयए विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र एनआयए न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी व्हीसी मार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, स्टॅन स्वामी यांना मंगळवारी कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांची कारागृहात योग्य ती काळजी घेतली जात आहे. असे राज्य सरकारच्या वतीने ऍड जयेश याग्णिक यानी सांगितले.

    तर, स्वामी यांना तुरुंगात पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर ते समाधानी आहेत असा दावा तसेच एनआयएच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडताना केला त्यांचा युक्तीवाद ऐकून घेत २० मे रोजी सकाळी जे जे रुग्णालयात तपासणी करिता घेऊन जाण्याचे आदेश दिले आणि वैद्यकीय अहवाल २१ मे रोजी सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

    हनी बाबूना ब्रीच कॅण्डीत दाखल करा

    याच प्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. सध्या जी टी रुग्णालयात हनी बाबुंवर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना डोळ्यांचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी बुधवारी . शाहरूख काथावाला आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत बाबू यांना वैद्यकीय उपचारासाठी उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले. तसेच वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च त्यांच्या कुटुंबियाना उचलावा असेही खंडपीठाने स्पष्ट केले.