भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; हनी बाबूंचा गुरुवारपर्यंत रुग्णालयातील मुक्काम वाढला

कोरोनामुळे मुंबईतील ब्रीच कॅंण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. येत्या ३ जूनपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, असे स्पष्ट निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला दिले.

    मुंबई : कोरोनामुळे मुंबईतील ब्रीच कॅंण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. येत्या ३ जूनपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, असे स्पष्ट निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला दिले.

    पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेचा भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंध जोडत पुणे पोलिसांनी रोना विल्सन, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. प्राध्यापक हनी बाबू यांना एनआयएकडून जुलै २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. त्यातच मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना सर्वप्रथम जे. जे रुग्णलयात त्यानंतर जीटी रुग्णलायत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    त्यातच हनी बाबू यांना डोळ्यांचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या पत्नी जेनी रोवेना यांनी उच्च न्यायालयात बाबू यांना अंतरिम जामीन आणि वैद्यकीय मदत मिळावी म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी एस. एस. शिंदे आणि न्या. अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, बाबूंच्या डोळ्याला झालेल्या संसर्गामध्ये आता थोडी सुधारणा दिसून येत आहे. तरीही त्यांना अधिक उपचाराची गरज असल्याची माहिती अँड. युग चौधरी यांनी खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत गुरवारपर्यंत हनी बाबू यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देऊ नये, असे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी ३ जूनपर्यंत तहकूब केली.