भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : स्टॅन स्वामींचा होली फॅमिली रुग्णालयातील मुक्काम वाढला

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले ८४ वर्षीय स्टॅन स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार आहे. स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्द्यावर विशेष एनआयए सत्र न्यायालयात दाखल केलेला सुटकेसाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे.

    मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते, फादर स्टॅन स्वामी (८४) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वामी यांच्यावर १८ जूनपर्यंत होली फॅमिली रुग्णालयातच उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णालय प्रशासनाला त्यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

    भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले ८४ वर्षीय स्टॅन स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार आहे. स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्द्यावर विशेष एनआयए सत्र न्यायालयात दाखल केलेला सुटकेसाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे.

    याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, स्वामी यांची तब्येत ढासळत असून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने स्वामी यांना १५ दिवस होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर गुरुवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली.

    तेव्हा, स्वामी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वामी यांना होली फॅमिली रुग्णालायातच १८ जूनपर्यत ठेवण्याचे निर्देश दिले आणि रुग्णालय प्रशासनाला त्यांना वैद्यकीय अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी १७ जूनपर्यत तहकूब केली.