भोसरी जमीन घोटाळा प्रकरण: हॉस्पीटलमध्ये असल्यामुळे एकनाथ खडसे वाचले पण पत्नी अजामीनपात्र वॉरंट जारी

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा(Bhosari land scam case) प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी आणि याप्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे(Mandakini Khadse) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केले. तर वैद्यकीय कारणास्तव नाथाभाऊंना दिलासा मिळाला आहे.

    मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा(Bhosari land scam case) प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी आणि याप्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे(Mandakini Khadse) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केले. तर वैद्यकीय कारणास्तव नाथाभाऊंना दिलासा मिळाला आहे.

    एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरींना २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. त्यामुळे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले आहेत.

    या व्यवहाराखाली जावाई गिरीश चौधरींना यांनी पाच सेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले आणि या सर्व व्यवहारात राज्य सरकारचा सुमारे ६१ कोटी रुपयांचा महसूल नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले म्हणून गिरीश चौधरींना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. अटकेच्याभितीपोटी मंदाकिनी खडसे यांनी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली.

    खडसे कुटुंबियांविरोधात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून १ हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आले असल्याचे सांगत तपास यंत्रणेने जामीन अर्जाला विरोध केला त्याची दखल घेत न्यायालयाने मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी तीन आठवड्यांची स्थगिती खडसेंच्यावतीने मागण्यात आली. मात्र ती मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.

    वैद्यकीय कारणास्तव नाथाभाऊंना दिलासा

    दुसरीकडे, वैद्यकीय कारणास्तव एकनाथ खडसेंना तूर्तास दिलासा दिला आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाख खडसे हे सध्या बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

    जावई चौधरींचाही अर्ज फेटाळला

    त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयाने याआधीच फेटाळून लावला आहे. चौधरी यांनी याप्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचा असा आरोप केला होता. मात्र विशेष पीएमएलए न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता.