एकनाथ खडसे यांच्या जावयाचा कोठडीतील मुक्काम वाढला; मोठा घोटाळा असल्याचा ईडीला संशय

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

    मुंबई : पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयाने १९ जुलैपर्यंत वाढ केली.

    एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

    या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मागील मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांना न्यायालयाने १५ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. गुरुवारी कोठडी संपत असल्याने चौधरी यांना मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा, सदर प्रकरणातील व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध आहे. त्यासंदर्भात तपास आणि पुरावे गोळा करण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या चौकशीसाठी चौधरी यांच्या कोठडीत वाढ देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने चौधरी यांच्या ईडी कोठडी १९ जुलैपर्यंत वाढ केली.