समुद्र आणि मरिन ड्राईव्हचे मनमोहक दर्शन घडवणारी ‘दर्शक गॅलरी’; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीच्या वरती सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.

    मुंबई – मुंबईतील पर्यटन स्थळांमध्ये महत्त्वाचे आकर्षण असणा-या आणि राणीचा रत्नहार अशी ओळख असणा-या मरिन ड्राईव्ह येथे एक नवे पर्यटन स्थळ आकारास येणार आहे. गिरगांव चौपाटीच्याच्या कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत समुद्राचे आणि मरिन ड्राईव्हचे दर्शन घडविणा-या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

    शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीच्या वरती सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.

    या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे तसेच ‘क्विन्स नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय व मनमोहक दर्शन घडविणा-या गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. भरती – ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधीत परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. पुढील तीन महिन्यात ही गॅलरी आकारास येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे लोकापर्ण

    वत्सलाबाई देसाई चौकाजवळ उभारण्यात आलेल्या कच-यापासून वीज निर्मिती करणा-या प्रकल्पाचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामध्ये दररोज २ हजार किलो कच-याचा वापर करुन वीज निर्मिती केली जाणार आहे. दररोज सुमारे २५० ते ३०० युनिट इतकी वीज निर्मिती होईल, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात आंशिक बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चात देखील बचत करणे शक्य होणार आहे. प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थानिक नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.