काँग्रेसला मोठा धक्का, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंहांचा भाजपात प्रवेश

कृपाशंकर सिंह यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

    मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह गेल्या काही काळापासून झाकोळले गेले होते. अशावेळी आता कृपाशंकर सिंह यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

    फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी यतीन कदम यांनीही प्रवेश केला. आपल्यासाठी आनंदाची बाब की ताकद असलेले लोक प्रवेश करतात. मी त्यावेळी म्हणालो होतो की मोठी संधी आहे. जिथे लोक भाजपच्या विरोधात एकवटले तिथे भाजप वाढतो. त्यामुळे १-२ टर्म सत्ता नसेल तर आम्ही विचार करत बसत नाही. ज्यावेळी ३७० कलमाचा विषय आला त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागं झालं तेंव्हा त्यांना वाटले की भारताला एक संघ बनवण्यासाठी मोदी हे प्रयत्न करत असेल तर मदत केली पाहिजे. त्यांनी २१ महिने झाले काँग्रेस सोडून ते मधल्या काळात ३७० कलम बद्दल जनगागृती करत होते, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

    कृपाशंकर सिंग काय म्हणाले?

    तर, ‘देवेंद्र फडणवीस यांनी मला कधी अडचणीत आणले नाही. मंत्री असताना ते प्रश्न विचारायचे. मी सांगायचो की नंतर उत्तर देतो ते मान्य करायचे. मी ठरवले की जर मला राजकारण करायचे असेल तर ते भाजपमध्येच करेन. तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास दाखवा मी तो पूर्ण करेन, असं यावेळी कृपाशंकर सिंग म्हणाले.

    खरंतर गेल्या काही वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा कृपाशंकर सिंग यांचा प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नांना त्यांना वेळोवेळी निराशा आली. ते गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा कायम होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी सिंधुदूर्गात जाऊन भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मुंबईत ते करू पाहत असलेल्या उत्तर भारतीयांच्या एक लाखांच्या मेळाव्याला अमित शहा यांनी यावं, असं त्यांनी निमंत्रण देखील दिले होतं. अखेर या भेटीतून कृपाशंकर सिंग यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग निघाला आहे.