कोट्यवधीचे कारखाने कवडीमोल भावात विकले; ‘जरंडेश्वर’प्रकरण चांगलेच तापले

    मुंबई : सहकारी साखर कारखान्याच्या मुद्यावरून माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदा खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यातील 55 सहकारी साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली. हे कारखाने काही खासगी कंपन्यांकडून कवडीमोल पैशातून खरेदी करण्यात आले. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर आणि अन्य नेते, समाजसेवकांनी आझाद मैदानातून कारवाईची मागणी केली होती. मात्र, शेकडो कोरी रुपये किमतीचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेल्याचा आरोप सदा यांनी मुंबईत केला. याप्रकरणी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

    7 कोटी रुपरांना खरेदी केलेल्या साखर कारखान्यावर 400 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते. जरंडेश्वर साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर ऊस कुठे घालवावा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या कारखान्यावर प्रशासक नेमावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान थांबवावे. सहकार क्षेत्रात झालेल्या घोटाळ्याबाबत आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पत्र देणार आहोत. या क्षेत्रात झालेल्या घोटाळ्याबाबत चौकशीची मागणी शहांकडे करू.

    ईडीचा रत्नागिरी जिल्हा बँकेला ई-मेल!

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. आता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी ईडीने माहिती मागितली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचे पत्र प्राप्त झाले आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणात हे पत्र आले आहे. कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यात आला, तारण काय घेण्यात आलं आहे, आदी माहिती ईडीने मागितली असून, तसा ईमेल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आला आहे. या वृत्ताला बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनीही दुजेरा दिला आहे.