काळाने घातला घाला! …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय

स्वप्निल हा दिवा येथे राहत असून, लॉकडाऊन लागल्याने तो तळीये येथे राहण्यास गेला होता. २२ जुलैला आपल्या दिवा येथील मित्रांसोबत वाढदिवस साजरा करता येणार नसल्याने काहीसा निराश असला तरी गावातील मित्र आणि नातेवाईकांसोबत वाढदिवस साजरा मात्र त्यादिवशी सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने त्याने वाढदिवसाचे नियोजन केले नव्हते.

  मुंबई : … २२ जुलै हा स्वप्निलचा वाढदिवस… ताे दिवसच त्याच्यासाठी काळा दिवस ठरला. दरडी कोसळल्याने त्याच्या ढिगाऱ्यात तब्बल १० तास अडकलेल्या स्वप्निल शिरावळेवर दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली. २५ वा वाढदिवस हा स्वप्निलच्या आयुष्यात एक दु:खद क्षण ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावामध्ये २२ जुलैला दुपारी दरड कोसळली. या दरडीमध्ये गावातील तब्बल ३२ घरे सापडली यातच जोरदार पाऊस होत असल्याने आपल्या जुन्या घरामध्ये असलेल्या भावाच्या मुलांना आणण्यासाठी निघालेला स्वप्निल

  मुसळधार पावसात अडकला

  स्वप्निल हा दिवा येथे राहत असून, लॉकडाऊन लागल्याने तो तळीये येथे राहण्यास गेला होता. २२ जुलैला आपल्या दिवा येथील मित्रांसोबत वाढदिवस साजरा करता येणार नसल्याने काहीसा निराश असला तरी गावातील मित्र आणि नातेवाईकांसोबत वाढदिवस साजरा मात्र त्यादिवशी सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने त्याने वाढदिवसाचे नियोजन केले नव्हते.

  दुपारनंतर पावसाचा जोर वाढू लागल्याने आपल्या जुन्या घरात असलेल्या मोठ्या भावाच्या मुलांना आणण्यासाठी स्वप्निल मित्रासोबत नवीन घरातून बाहेर पडला. जुन्या घराच्या दिशेने जात असताना त्याला दरड कोसळल्याचे दिसले. दरड कोसळत असल्याचा अंदाज येताच त्याने भावाच्या मुलांना घरातून बाहेर काढण्यासाठी वेगाने जुन्या घराच्या दिशेने धाव घेतली.

  मात्र काही क्षणातच मोठा आवाज करत आलेल्या दरडीतील माती, चिखल व पावसाच्या पाण्याने स्वप्निलला घरापासून दूर फेकले. काही कळायच्या आतच स्वप्निल कमरेपर्यंत माती, चिखलाच्या ढिगाऱ्याखाली सापडला. आसपासच्या झाडांच्या आधाराने त्याने चिखलातून बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर रात्री १ ते १.३० च्या सुमारास काही गावकरी तेथे आले व त्यांनी स्वप्निलला बाहेर काढले.

  मात्र गावामध्ये कोणतेही वाहन नसल्याने त्याला सकाळी १० वाजेपर्यंत शेजारील वाडीतील एका घरातच ठेवण्यात आले. त्याला खासगी वाहनाने प्रथम महाड माणगाव रुग्णालय आणि तेथून जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. जे.जे. रुग्णालयात डॉक्टराने तातडीने उपचार सुरू केले. पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पाय गुडघ्यापासून निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाय वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण डॉक्टरांसमोर त्याचे पाय कापण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.

  स्वप्निलला सकाळी १० च्या सुमारास पिक अपमध्ये इतर जखमींसाेबत रुग्णालयात पाठवले. भावे गावाजवळील पूल वाहून गेल्याने तेथील गावकऱ्यांनी जखमींना खाटांवर तसेच खांद्यावरून उचलून तब्बल दीड किलोमीटरचे अंतर कापत ढालकाठी गावापर्यंत नेले. तेथून खासगी गाडीने महाड शासकीय रुग्णालयात नेले.

  परंतु महाड रुग्णालयात एक मजल्यापर्यंत पाणी साचल्याने तेथून माणगाव शासकीय रुग्णालयात नेले. तेथे तात्पुरते उपचार करून स्वप्निलला १०८ च्या रुग्णवाहिकेने जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले. या प्रवासाला तब्बल अकरा तास लागले.