
मुंडे यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलींची माहिती लपवली होती, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर एक महिलेनं तक्रार केल्यानंतरही त्याबाबत गुन्हा दाखल होत नाही, हाच का सामाजिक न्याय? असा सवालही सोमय्या यांनी केलाय.
मुंबई : बलात्कारासारखा आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन काढा, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत त्या नंतर भाजप नेते किरिट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडेंची हकालपट्टी करण्यापासून ते आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा- सोमय्या
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. बलात्कारासारखा आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन काढा, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलींची माहिती लपवली होती, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर एक महिलेनं तक्रार केल्यानंतरही त्याबाबत गुन्हा दाखल होत नाही, हाच का सामाजिक न्याय? असा सवालही सोमय्या यांनी केलाय.
मुंडेंची आमदारकी रद्द करा- भातखळकर
किरिट सोमय्या यांच्यासह भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवली आहे. हा एकप्रकारे निवडणूक प्रक्रिया आणि नियमांची पायमल्ली असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.