मुंबईत लहान मुलांसाठी स्वतंत्र ‘कोविड सेंटर’ची उभारणी करा ; भाजपची मागणी

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यात हाहाकार माजला आहे. त्यातच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस अद्याप बाजारात आलेली नाही. तसेच, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    मुंबई – कोरोनाच्या दुस-या लाटेत मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे कोरोनाची विदारक परिस्थिती आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने मुंबईतील आवश्यक ठिकाणी लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावीत, अशी मागणी भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

    याबाबत तत्पर असलेल्या पुणे महापालिकेमार्फत खास लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांसह त्यांच्या पालकांना राहण्याची सोय, लहान मुलांसाठी पक्षी, प्राण्यांची चित्रे, खेळणी, लहान मुलांची व्हिडिओ गाणी, अशा अनेक मनोरंजन करणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

    त्यामुळे सद्याची स्थिती लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेनेही लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारावीत. अशा कोविड सेंटरमध्ये बालरोग तज्ञांचीही नेमणूक करावी, अशी मागणीही शिरसाट यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.