कोकणातील पुरग्रस्तांना भाजपाच्या वतीने मदतीचा हात; श्रीगणेशाच्या मूर्ती व जीवनावश्यक वस्तुंच्या गाडीला दाखवला हिरवा झेंडा

जपाच्या वसई विरार विभागातर्फे पुरग्रस्तांसाठी गणेशाच्या ३०० मूर्तींचा एक ट्रकही कोकणात रवाना करण्यात आला. कोकणवासियांना पाठविण्यात आलेल्या या दोन्ही ट्रकना विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला.

    मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन व त्यामध्येच कोकणात नुकतीच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणवासीयांचे व्यवसाय व जनजीवन ठप्प झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात मूर्तिकारांचे कारखाने पाण्य़ाखाली गेले आहेत. ही संकटमय परिस्थिती ध्यानात घेता व कोकणवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपाच्या वतीने उत्तर भारतीय विभागाकडून कोकणातील बहिणींसाठी रक्षाबंधन निमित्त चिपळूण येथील भिले यागावी कपडयांसह भांडी आणि जीवनावश्यक साहित्यांचे संच असलेली गाडी कोकणासाठी रवाना करण्यात आली.

    तसेच भाजपाच्या वसई विरार विभागातर्फे पुरग्रस्तांसाठी गणेशाच्या ३०० मूर्तींचा एक ट्रकही कोकणात रवाना करण्यात आला. कोकणवासियांना पाठविण्यात आलेल्या या दोन्ही ट्रकना विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टी मुंबई चे उपाध्यक्ष अमरजीत मिश्र, कोकण विकास आघाडी- मुंबईचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, मनोज दुबे, राकेश सिंह, संतोष दिक्षित, शंभू सिंह, अभिजित राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

    दरेकर यांनी सांगितले की, वसई -विरारमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात कोकणवासीयांसाठी पुढे केला आहे. कामगार क्षेत्रात काम करत असताना कोकणवासीयांना मदत करून त्यांना दिल्याबद्दल कोकणवासीयांतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत आहे. कोरोना संकटाबरोबर कोकणात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे आज सर्व व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक छोट्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे शासनाची बंधने तर दुसरीकडे मागणीच नाही. संकट काळात कारागिरांवर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे मूर्तिकार मूर्तीही बनवू शकत नाहीत. त्यामुळे आपले आराध्य दैवत गणपतीचा सण कसा साजरा करायचा, अशी विवंचना असताना आज ३०० गणपतीच्या मूर्ती भाजपकडून कोकणात चिपळूण येथे पाठविण्यात आल्या असून कोकणवासी श्रद्धाळू भक्तांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

    कोकणवासियांना मदतीचा हात देण्यामध्ये उत्तर भारतीय समाजाचाही समावेश आहे. जेव्हा जेव्हा मुंबईत, महाराष्ट्रात आपत्ती आली, संकटे आली मग ते निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तोक्ते चक्रीवादळ, तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रासाठी उत्तर भारतीय समाज अत्यंत ताकदीने उभा राहिला आहे. याच पद्धतीने आजही कोकणवासीयांना मदतीचा हात दिल्याबद्दल, व कोकणवासी बांधवांच्या, बहिणीच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.