केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाहीला झुंडशाहीचे स्वरुप देण्याचे काम सुरू; संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी : वर्धापनदिनी आजित पवारांचे फेसबूक लाईव्ह!

अजित पवार म्हणाले की, राज्यात आपले सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचे संकट आले. मधल्या काळात राज्यात दोन वादळे येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, कितीही संकट येवोत, आव्हान येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी ठणकावले. वित्तमंत्री पवार म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे.

    मुंबई : केंद्रातील भाजपच्या सरकारने देशातील एकता आणि अखंडतेला धक्का देण्याचे, लोकशाही संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू केले आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचे स्वरुप देण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, अशी भुमिका उपमुखय्मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.

    महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही
    अजित पवार म्हणाले की, राज्यात आपले सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचे संकट आले. मधल्या काळात राज्यात दोन वादळे येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, कितीही संकट येवोत, आव्हान येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी ठणकावले. वित्तमंत्री पवार म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणाम झाला आहे, भाजपचे केंद्रात सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे, मात्र कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने लोकांना प्रचंड मदत केली. बेड, औषधे, अन्यधान्य आणि इतर शक्य ती मदत देण्याचे काम आपण केले आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत आपल्याला ही मदत करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.