प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक हात जनसेवा करण्यासाठी पुढे येत आहेत.  राज्यात कोविड सेंटरची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याचाच भाग म्हणून या संकटकाळात भाजपाकडून ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली जात आहेत.

    मुंबई (Mumbai).  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक हात जनसेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. राज्यात कोविड सेंटरची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याचाच भाग म्हणून या संकटकाळात भाजपाकडून ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली जात आहेत. परंतु राज्यसरकार केवळ घोषणा देण्याचे काम करीत आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

    आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबईतील उलवे नोड आणि जोगेश्वरी येथील कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.  यावेळी दरेकर बोलत होते.  दरेकर म्हणाले, एका बाजूला सरकार घरात बसून घोषणा देण्याचे काम करत असताना, सरकार म्हणून असलेली जबाबदारी पूर्ण करीत नसताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत  असल्याचे आपल्याला दिसून येईल.

    भाजपा संकटकाळात जनतेच्या पाठीशी
    भाजप कोरोना संकटकाळात गोरगरिबांसाठी, आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे.  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर फिरून अनेक जिल्ह्यात स्वतः जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत आहेत.   भाजपा लोकप्रतिनिधींकडून रुग्णांना मदत म्हणून अनेक कोविड सेंटर्स उभारली जात आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावती येथे जाऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेमधील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला, २ दिवसांपूर्वी नाशिक येथे जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत तेथील आयुक्तांशी चर्चा करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मी स्वतः त्यावेळी त्यांच्याबरोबर होतो, काल पालघर येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी करून अनेक बाबींची दखल आम्ही घेतली.  ‘सरकार’ म्हणून ज्यांनी जागेवर जाऊन काम करण्याची आवश्यकता होती ते घरात बसले असले तरी ते काम देवेंद्र फडणवीस कर्तव्य भावनेतून करीत आहेत. भाजपा या संकटकाळात जनतेच्या पाठीशी कायम राहील, असेही दरेकर म्हणाले.