गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप राज्यभर आक्रमक : प्रमुख नेत्यांचा सहभाग!

भाजप कार्यकर्ते अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारला थोडी जरी शरम असेल तर त्यांनी सत्ता सोडावी.  

    मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सेवेत असलेल्या सनदी पोलीस अधिका-याने खंडणीचे आरोप केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या  मागणीवर भाजपने राज्यभर आक्रमक आंदोलन केले आहे. नागपूरात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तर मुबईत अन्य विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी आंदोलनात भाग घेतला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पुण्यात आंदोलन करत गृहमंत्र्याना घरी पाठविल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे तसेच राज्यपालांना सरकार बरखास्त करण्याचे आवाहन केले.

    पुण्यात अलका टॉकीज चौकात
    पुण्यात अलका टॉकीज चौकात गृहमंत्र्यांच्या विरोधात आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर असून गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ते म्हणाले की प्रत्येकवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्याना वाचविण्यासाठी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यावर दबाव आणला जात आहे.
     
    नागपूरात फडणवीस आंदोलनात
    नागपूरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात भाग घेतला. त्यांनी पत्रकार परिषद घेत सनदी अधिकारी सुबोध जयस्वाल यांचा अहवाल मुख्यमंत्र्यानी दाबल्याने ते राज्याबाहेर निघून गेल्याचा आरोप केला. यावेळी सिव्हिल लाईन्स येथील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घोषणा देणा-या २५ कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

    ठाण्यातही आंदोलन
    ठाण्यात पोलीस आयुक्तालयाजवळच सेंट्रल मैदान चौकात भाजप जनता युवा मोर्चा आणि पदाधिका-यांनी घोषणा देत सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी अध्यक्ष आ. निरंजन डावखरे, संजय केळकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी नारेबाजी करून करण्यात आली. मंत्रीच पोलीसांना खंडण्या गोळा करण्यास सांगत असल्याने हे सरकार खंडणीखोर असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे यावेळी केळकर म्हणाले.

    कल्याणमध्ये आमदार गायकवाड
    कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री रविंद्र चव्हाण आणि अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्व येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलन करत निषेध नोंदवला. या आंदोलनात ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे सरकार खंडणीखोर सरकार असून तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी अजून किती वाझे या सरकारकडे आहेत याचा तपास केला पाहिजे, सरकारला थोडी जरी शरम असेल तर त्यांनी सत्ता सोडावी अशी मागणी त्यांनी केली.

    अंबरनाथमध्ये देशमुखांच्या फोटोला नोटांचा हार
    ठाकरे सरकार विरोधात भाजपचे अंबरनाथच्या शिवाजी चौकात जोरदार निदर्शन करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या फोटोला नोटांचा हार घालण्यात आला आणि महिलांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये रविवार कारंजा परिसरात हातात निषेधाचे फलक घेत आज सकाळी भाजपने आंदोलन करत ठाकरे सरकार भ्रष्ट आहे अशी घोषणाबाजी केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष, युवा आघाडी आणि महिला कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड शहरातील भाजपा कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार हे हप्ते वसुली करणारे सरकार आहे अशा आशयाचे फलक यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

    अकोला शहरातील गांधी चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. भाजप आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार आणि जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. चंद्रपूर जटपुरा गेट परिसरात भाजप कार्यकर्ते अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झाले आहेत. जटपुरा गेट परिसरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले. शंभर कोटी खंडणी मागणाऱ्या अनिल देशमुखांना बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. जनता कोरोना काळात दहशतीत असताना सत्ताधाऱ्यांची कोटी कोटी उड्डाणे घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

    जालन्यात निषेध आंदोलन
    जालना येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. शहरातील सावरकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी गृहमंत्री खंडणीखोर असल्याचा आरोपाचे फलक दाखवून हा निषेध केला. अनिल देशमुख यांनी राममंदिर निधीला खंडणी संबोधले होते मात्र खरी खंडणी तेच जमा करत असून त्यांच्यामुळे पदाला काळिमा फासला  जात असल्याने  त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय. यावेळी आंदोलकांनी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली.

    पालघर हुतात्मा चौकात
    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी पालघर मधील हुतात्मा चौकात आंदोलन केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची भाजपा कार्यकर्त्यांनी मागणी केली. यावेळी  राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांविरोधात  कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

    प्रदेश भाजप कार्यालयात दरेकर
    प्रदेश भाजप कार्यालयासमोर युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, माजी खासदार किरीट सोमैय्या, विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आंदोलनात भाग घेतला. यावेळी सरकार विरोधात घोषणा देत प्रतिकृतीला चपलांचा चोप देण्यात आला. त्यावेळी पोलीसांशी कार्यकर्त्यांची झटापट देखील झाली. दरेकर यांनी गृहमंत्री सभागृहात ज्या पोलीस अधिका-यांना पाठीशी घालत होते त्यांनी त्यांचे सत्य बाहेर काढल्याचे सांगितले. दरेकर म्हणाले की, सरकार खंडणी मागण्यासाठी आहे का? हा निंदनीय असा आरोप आहे. सत्य वस्तूस्थिती हे राज्यातील जनतेला समजली पाहिजे. त्यामुळे ह्याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी दरेकर यांनी आंदोलनात केली.