मंत्रालयाच्या केबीनमध्ये बसून नवी मुंबईत हेराफेरी; भाजपा नेते आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप मतदार याद्यांमधे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, बनवाबनवी करण्यात आली आहे. मंत्रालयात केबीनमध्ये बसून हे केले जात आहे. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन नवी मुंबईतील मतदार यादीतील हेराफेरी उघड केली.

    मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप मतदार याद्यांमधे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, बनवाबनवी करण्यात आली आहे. मंत्रालयात केबीनमध्ये बसून हे केले जात आहे. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन नवी मुंबईतील मतदार यादीतील हेराफेरी उघड केली.

    शिवसेनेच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीने आज पर्यंत उमेदवारांची पळवापळवी केली. त्यानंतर आता मतदार पळवीपळवीचा अनोखा कार्यक्रम सुरु केला आहे.  याबाबत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले तर ते स्विकारले जात नाही. त्यामुळे जर याबाबत आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही.  ३ तारखेपर्यंत जर कायदेशीर मार्गाने बदल केले नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू असेही  आशिष शेलार यांनी सांगितले.

    भारतीय, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, विश्वास पाठक, यांच्यासह नवी मुंबई संघटन प्रभारी संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थितीत होते.

    सोसायटी आणि चाळीतील नावे दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे मतदार पसार करणे सुरु आहे. दुसरा प्रकार म्हणजे अधिकाऱ्यांंकडे तक्रार नोंदवायला गेल्यावर तक्रार घेतली जात नाही. म्हणजे हा कामचुकार तर अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळ पाहता याद्याच टूकार म्हणजे एक प्रकारे मतदारांच्या अधिकारालाच नकार दिला असल्याचे चित्र आहे. मंत्रालयात एसी केबीनमध्ये बसून हे सारे केले जात आहे. याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी  आशिष शेलार यांनी केली.

    नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. ४४ मधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार व स्थलांतरीत मतदारांची नांवे समाविष्ट असल्याची बाब १५० ऐरोली विधानसभा मतदार संघ मा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याअनुषंगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना स्थलांतरीत मतदारांचे यादी भागात नमूद पत्त्यावर स्थळ पाहणी करुन नांवे वगळणीकरीता पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने स्थळ पाहणी केली असता अनेक मतदार याठिकाणी वास्तव्यास नसल्याचे समोर आले व त्याबाबत नियमानुसार पंचनामे करुन मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत नावांची वगळणी करणे करिता एकूण ९०४ व्यक्तींच्या स्थलांतरीत मतदारांच्या पंचनाम्याची यादी मा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांना, मा. मतदार नोंदणी अधिकारी, १५० ऐरोली विधानसभा मतदार संघ यांनी दि. ३/२/२०२१ रोजी पत्र सादर केले आहे.

    जर दुबार, स्थलांतरीत नांवे नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्यास बोगस मतदान होणार आहे. त्याकरिता ती मतदार यादीमधून वगळण्यात यावीत असे भाजपाचे म्हणणे आहे.

    काय घडलेय नवी मुंबईत

    • १११प्रभात एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नांवे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो तसेच त्याने गत निवडणुकीमध्ये त्या प्रभागामध्ये मतदान केले आहे अशा व्यक्तींची नांवे इतर प्रभागातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभागरचनेनुसार ज्या प्रभागात सोसायट्या / चाळी येतात त्या सोसायट्या व चाळीमधील मतदारांची नांवे इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत.
    • उदा. कोपरखैरणे, प्रभाग क्र. ३९ मध्ये प्रभागरचनेनुसार येत असलेल्या सोसायट्या व चाळींमधील नांवे प्रभाग क्र. ४१ व प्रभाग क्र. ३८ मधील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
    • जी नांवे प्रभाग क्र. ४१ व ३८ मधील प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी अनेक नागरिक प्रभाग क्र. ३९ मध्ये वास्तव्यास असल्याचे पुरावे हरकतीद्वारे विभाग कार्यालयामध्ये सादर केले आहेत.
    • प्रभागरचनेनुसार प्रभागात येत असलेली एकाच हेडखालील नांवे दोन-तीन प्रभागात स्थलांतरीत करण्यात आली आहेत.
    • ज्या व्यक्ती त्या प्रभागात वास्तव्यास आहेत त्यांची नांवे दुसऱ्या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट का करण्यात आली आहेत, कोणत्या नियमानुसार व निकषानुसार ती दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत, ती कोणत्या अधिकारी / कर्मचारी यांनी टाकण्यात आली आहेत आणि ती कोणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात आली आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी.
    • ऐरोली, प्रभाग क्र. १५ मधील मतदारांची नांवे प्रभाग क्र. १६ व १८ मध्ये स्थलांतरीत झालेली आहेत तसेच इतर प्रभागातील नांवे प्रभाग क्रमांक १५ च्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्याबाबत अधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन दिले तर ते स्विकारले जात नाही.
    • ऐरोली प्रभाग क्र. २१ मधील मतदारांची नांवे दिघा प्रभाग क्र. ५ मधील मतदार याद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत याबाबत हरकत सादर करण्यास गेल्या त्याठिकाणी देखील अधिकारी / कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत त्यांना जाब विचारला असता उशीराने त्या स्विकारल्या जात आहेत. हे सर्व प्रकार कोणत्या नियमाला धरुन केले जात आहेत.
    • घणसोली प्रभाग क्रमांक २७ व प्रभाग क्र. २८ मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नावांची हेराफेरी करण्यात आली आहे. प्रभागात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नांवे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. आपल्या लोकांच्यामार्फत यादीमध्ये नमूद असलेल्या पत्त्यावर स्थळपाहणी केली असता सदरचे नागरिक त्याठिकाणी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
    • प्रभागरचनेनुसार, प्रभाग क्र. ७३ मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नांवे जाणीवपूर्वक चुकीच्या हेतूने प्रभाग क्र. ८० मधील प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
    • सानपाडा प्रभाग क्र. ७९ मधील मतदार यादीमध्ये अशाचप्रकारे तुर्भे, वाशी, नेरुळ, जुईनगर इत्यादी प्रभागातील मतदारांची नांवे या प्रभागातील यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
    • एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नांवे गेली असल्यास काही ठिकाणी अधिकारी / कर्मचारी हरकती स्विकारण्यास जाणीवपूर्वक उशीर व टाळाटाळ करीत आहेत.
    • नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत त्याअनुषंगाने त्याची चौकशी करुन कार्यवाही होणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक नागरिक हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    • हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक, चुकिच्या पद्धतीने, नियमांचे उल्लंघन करुन, अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने आर्थिक फायद्याकरिता तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडून करण्यात आला आहेत.
    • जे मतदार त्या प्रभागात राहत आहेत त्यांची नांवे पूर्ववत ठिकाणच्या मतदार यांद्यामध्ये समाविष्ट करण्याची गरज आहे.