भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट – कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची आयुक्तांनी दिली माहिती

सध्याच्या कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीच्या अनुषंगाने निरनिराळ्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इक्बालसिंंह चहल

 सध्याच्या कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीच्या अनुषंगाने निरनिराळ्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इक्बालसिंंह चहल यांची काल दुपारी महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनामध्ये भेट घेतली. याप्रसंगी महापालिका आयुक्तांनी सदर शिष्टमंडळाला महापालिका कोविडच्या अनुषंगाने करत असलेल्या विविध स्तरीय कार्यवाहींची माहिती दिली. तसेच शिष्टमंडळाची मतेही जाणून घेतली. सदर शिष्टमंडळाने महापालिका करीत असलेल्या कामांबद्दल याप्रसंगी समाधानही व्यक्त केले. 

महापालिका आयुक्त चहल यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधताना सर्वप्रथम महापालिका करत असलेल्या प्रतिबंधात्मक कामांची संक्षिप्त माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने आयसीएमआर, केंद्र व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका सर्व उपाययोजना करीत आहे. मुंबईत आतापर्यंत सुमारे २ लाख १६ हजार व्यक्तिंची तपासणी केली आहे. तर जवळपास ४५ हजार ८०० बाधित रूग्ण आढळले. यापैकी १९ हजार रुग्ण बरेदेखील झाले असून सक्रिय रुग्ण सुमारे २५ हजार ६०० आहेत. मृतांची संख्या १ हजार ५१८ आहे. मुंबईतील मृत्यू दरदेखील आपण नियंत्रणात आणला असून तो आता ३.३ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे. मुंबईतील कोविड रुग्ण दुप्पट वाढीचा कालावधी पूर्वीच्या १२ दिवसांवरुन आता थेट २० दिवसांवर वाढला असून परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे हे निदर्शक आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे योग्य नियोजन, रुग्णांच्या नजीकच्या संपर्कातील मोठ्या प्रमाणावर शोध तसेच चाचण्यांचे सुसूत्रीकरण, चाचण्यांचे अहवाल तातडीने देण्याचे निर्देश अशा निरनिराळ्या कामांमधून प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी यावेळी नमूद केले. कोरोना बाधितांवर रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती देतानाच यासाठी उपलब्ध असलेल्या खाटांची व आवश्यक त्या वैद्यकीय उपकरणांची माहितीही महापालिका आयुक्तांनी दिली.

समर्पित कोरोना रुग्णालयांमध्ये सुमारे ६ हजार २०५ खाटा तर समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये ३ हजार ०८७ अशा ९ हजार २९२ खाटा आहेत. कोरोना काळजी केंद्र २ म्हणजे जिथे व्यवस्थेमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांना व अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल केले जाते, तेथे ७ हजार १०५ खाटा उपलब्ध असून ही क्षमता वाढवून २९ हजार खाटांची केली जात आहे. अतिदक्षता उपचारांसाठी सुमारे १,६०० खाटा उपलब्ध आहेत. सोबत, कोरोना काळजी केंद्र १ स्वरुपाच्या व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तिंना दाखल करुन उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत साडेतीन लाखपेक्षा अधिक नागरिकांना घरी अलगीकरण करण्यात आले. सोबतच, गोरेगांव येथील नेस्को मैदानावर २२०० खाटा, वरळी येथील एनएससीआय डोममध्ये १२५० खाटा, वांद्रे येथील बीकेसी मैदानावर १ हजार खाटा, माहिम निसर्गोद्यान येथे २०० खाटा याप्रमाणे विविध जम्बो फॅसिलिटीज उभारण्यात आल्या असून त्या सर्वांचा विस्तारही करण्यात येतो आहे. त्याठिकाणी आयसीयू व ऑक्सिजन बेड तसेच पुरेसे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारीही नेमलेले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये ३९८ फीवर क्लिनिक सुरु करुन त्या माध्यमातून तपासणी करुन बाधितांचा शोध घेतला जात आहे. यामुळे कोरोना बाधितांवर उपचारांसाठी प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही, हे यातून स्पष्ट होते, असे आयुक्तांनी नमूद केले. 

महापालिकेद्वारे रुग्णवाहिकांची सेवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने रुग्णांना मिळावी, यासाठी प्रथमच उबेर प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे. रुग्णांसाठी कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती देणारा डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे, असे सांगून आयुक्त चहल पुढे म्हणाले की, कोरोना रुग्णांसाठी निरनिराळ्या सेवा-सुविधांची माहिती देणे, त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे यादृष्टीने मार्गदर्शन करण्‍यासाठी १९१६ या नागरी दूरध्वनी क्रमांकावर विशेष मदत सेवा २४ एप्रिल २०२० पासून कार्यान्वित केली. मुख्यालयातदेखील या सेवेच्या लाइन्स दुप्पट करण्यात आल्या आहेत. ही सेवा आता विकेंद्रीत पद्धतीने सर्व २४ विभाग स्तरावर उपलब्ध करुन देण्यात असून ती लवकरच कार्यान्वित होईल. त्‍यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात तीन सत्रांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत असतील. डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी देखील स्वतंत्र डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे. मुंबईतील नोंदणीकृत १६८ डायलिसिस केंद्रांपैकी १७ केंद्र कोरोना बाधित डायलिसिस रुग्णांना सेवा देत असून त्यासाठी १०५ संयंत्र कार्यान्वित आहेत.महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमधील खाटांचे वितरण हे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, याविषयीचे समन्वयन करण्याची जबाबदारी सनदी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांतील खाटांचे व्यवस्थापनासह वैद्यकीय तज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता, सीसीटीव्ही यंत्रणा सुरु करणे, उपहारगृह सुरळीत सुरु ठेवणे अशी प्रशासकीय जबाबदारी देखील ते पार पाडत आहेत. खासगी रुग्णालयांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अधिकारी-कर्मचारी नेमले आहेत, असे आयुक्त चहल यांनी नमूद केले. परिस्थितीवर मात करुन आणि शक्य ती सर्व कार्यवाही केली जात आहे. असे असले तरी प्रशासनाला लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणाऱया सुचनांचा योग्य तो विचार करुन त्यावर देखील अंमल करण्यात येईल. प्रशासनाच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींसह जनतेचेही सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार मानून हे सहकार्य यापुढेही मिळावे, अशी अपेक्षा आयुक्तांनी अखेरीस व्यक्त केली व चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले.