भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांना दिले आव्हान

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील 'पत्र वॉर'चे पडसाद राज्यात उमटताना दिसतायत. यावरून शिवसेना आणि भाजप यांच्या आरोप प्रत्यारोप रंगायला सुरुवात झालीय.

आम्हाला हिंदुत्व (Hinduism) सिद्ध करण्यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची (Certificate) गरज नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मदरशांमध्ये कुठलेही आधुनिक शिक्षण दिले नाही. तिथे केवळ एका धर्माचे शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील मदरसे वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. राज्यातील करदात्यांच्या पैशांवर चालणारे हे प्रकार योग्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी मदत थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणी भातखळकर यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांना आव्हान देताना भातखळकर यांनी शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा दाखला दिलाय. मदरशांना आतंकवादी संघटनांकडून पैसे पुरवले जात असल्याचा आरोप वसीम रिजवी यांनी केला होता. यावर मदरसे बंद करून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाची सोय करणे हाच योग्य उपाय असल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय. नुकताच आसाम सरकारनं तिथले सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं.