सचिन वाझेंना निलंबित करा, भाजप आमदारांची विधिमंडळाबाहेर निदर्शने

सचिन वाझेंना निलंबित करा, अशी मागणी करणारे फलक झळकावत भाजप आमदार आज विधिमंडळाच्या परिसरात आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात संशयाची सुई सचिन वाझे यांच्याकडे निर्देश करत असल्यामुळे त्यांना निलंबित करून या प्रकऱणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

    महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून गाजत असलेल्या मनसुख मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या निलंबनाची मागणी भाजपनं लावून धरलीय. या प्रकऱणात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांवर आरोप करत असून अधिकारी सचिन वाझेंच्या निलंबनाच्या मागणीसाठी भाजपच्या आमदारांनी आज (बुधवार) विधिमंडळ परिसरात ठिय्या दिला.

    सचिन वाझेंना निलंबित करा, अशी मागणी करणारे फलक झळकावत भाजप आमदार आज विधिमंडळाच्या परिसरात आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात संशयाची सुई सचिन वाझे यांच्याकडे निर्देश करत असल्यामुळे त्यांना निलंबित करून या प्रकऱणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं दिलेल्या जबाबानुसार सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात गेल्या काही महिन्यात अनेक व्यवहार झाल्याचं स्पष्ट होत असल्याचं फडणवीस म्हणाले. अनेकदा मनसुख आणि वाझे यांच्या भेटी झाल्याची माहिती मनसुख यांच्या पत्नीने दिली आहे. मनसुख यांची गाडीदेखील वाझेंकडे असल्याची माहिती नोंदवण्यात आलीय. तर सचिन वाझेंनी मनसुख यांना अटक होण्याचा सल्ला दिला होता आणि लवकरच जामीनावर सुटका करण्याचं आश्वासनही दिलं होतं, असं मनसुख यांच्या पत्नीनं जबाबात नोदंवल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

    या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आसमनेसामने उभे ठाकलेत. शिवसेनेशी संबंधित सचिन वाझेंनी सरकारच्या संमतीनेच मनसुख हिरेन यांचा काटा काढला काय, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केलाय. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये आणि सर्व प्रकरणांची चौकशी करावी, असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला दिलंय.

    अधिवेशनात हाच मुद्दा सध्या गाजत असून पुढील काही दिवस दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे. या प्रकऱणात सचिन वाझेंवर निलंबनाची कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.