पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री राम शिंदेना उतरविण्याच्या हालचाली?

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे

    मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वबळाचे दंड धोपटल्यानंतर, पंढरपूर पोटनिवडणूक भाजपसाठी सुद्धा प्रतिष्ठेची झाल्याचे दिसत आहे. भाजपकडून राम शिंदेंना यांना मैदानात उतरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

    पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा प्रमुख सामना रंगणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच सत्ताधारी आघाडीशी फारकत घेऊन स्वाभिमानीने स्वबळाचे निशाण उभारले असतानाच, भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपची सुद्धा येथे प्रतिष्ठापणाला लागली आहे.

    राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उशीर का केला जातोय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पंढरपूरमध्ये बैठक घेतली. मात्र, त्यावेळी उमेदवारी जाहीर केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असेल याचे तर्कवितर्क मतदारसंघात लढविले जात आहेत.

    दुसरीकडे भाजपचा उमेदवारही अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही. भाजप प्रभारींनी बैठक घेत उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितले. भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु होती. पण आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले डॉ. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे येत आहे.

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचं समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचं बोललं जात आहे.

    चौरंगी लढतेची शक्यता
    राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके कुटुंबाला उमेदवारी मिळाली नाही तर भगिरथ भालके हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे लढत चौरंगी होऊ शकते. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेठा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणखी चुरशीची होईल चित्र निर्माण झालेले दिसते.