शाळा सुरु होण्यापूर्वीच बीएमसीची मास्क खरेदीची घाई, २० कोटींच्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध

अजून शाळा सुरु करण्याचे निश्चित झालेले नसताना त्याआधीच २० कोटी रुपये खर्च करून मास्क खरेदीचा प्रस्ताव कशासाठी असा सवाल भाजपने विचारला आहे.

मुंबई – कोरोना (kovid 19)  आटोक्यात येत असल्याने मुंबईत ( Mumbai school) १५ जानेवारीनंतर शाळा सुरु होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका ( BMC) शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मास्कचे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याला भाजपने विरोध केला आहे. अजून शाळा सुरु करण्याचे निश्चित झालेले नसताना त्याआधीच २० कोटी रुपये खर्च करून मास्क खरेदीचा प्रस्ताव कशासाठी असा सवाल भाजपने विचारला आहे.

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. त्यामुळे १५ जानेवारीनंतर मुंबईतील शाळा उघडतील असे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये २ लाख ९६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. शाळा सुरु झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग, तोंडावर मास्क लावणे या गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे. पालिका शाळांतील विद्यार्थी हे गरीब घरातील असून कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध व्हावे यासाठी २० कोटी रुपये खर्च करून मास्क खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र अजूनही शाळा कधी उघडणार शिवाय सर्व तुकड्या सुरु केल्या जाणार आहेत का याचे अद्याप निश्चित झालेले नसताना मास्क खरेदी कशासाठी असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. स्थायी समितीत या प्रस्तावाला विरोध केला जाईल असे भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.
…..