‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया

“लोकांचा आक्रोश पाहून नारायण राणे संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केली,” असं प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. पण राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांच्या समोर गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

  मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्याने नारायण राणेंचा संताप झाला होता. यावेळी एका अधिकाऱ्याला नारायण राणे झापत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर यावेळी मधे बोलू पाहणाऱ्या कार्यकर्त्याला ‘थांब रे, मध्ये बोलू नको’ असंदेखील म्हणाले होते. या संपूर्ण घटनेवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  “लोकांचा आक्रोश पाहून नारायण राणे संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केली,” असं प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

  नेमकं काय घडलं होतं –

  राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांच्या समोर गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

  त्याचे झाले असे, चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्याने भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत आम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”

  त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं राणेंना सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले आणि समोर असलेल्या अधिकाऱ्याला राणे खडे बोल सुनावत असताना, अचानक मध्येच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मध्येच काहीतरी पुटपुटले आणि मग नारायण राणे यांनी, थांब रे, मध्ये बोलू नको, असा दमच दिला. यावेळी दरेकर गप्प बसले आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. सध्या याचीच जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.