ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याच्या खासदार शेवाळेच्या पत्रावरून भाजप प्रवक्ते उपाध्ये यांची टिका

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे नवा उड्डाणपूल निर्माण होत असून या पुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद मोईनुद्दीन चिश्ती- अजमेर (गरीब नवाज) यांचे नाव देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. छेडानगर ते मानखुर्द असा हा उड्डाणपूल आहे. या पुलाचे नामकरण करण्याची मागणी तारीक उल्मा-ए-अहले सुन्नत या संस्थेने केल्याचे खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्रात म्हटले आहे. 

    मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नांव देण्याच्या आंदोलनाचा विषय सुरू आहे. त्यावर शिवसेनेची बचावात्मक भुमिका आहे. आता मानखुर्दच्या उड्डाणपुलाला ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याच्या शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांच्या पत्रावरून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टिका केली आहे.

    व्टिट करत शिवसेनेवर निशाणा

    मानखुर्दच्या उड्डाणपुलाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचा निर्णय पूर्वी झाला असताना शिवसेनेने हिंदुत्व सोडले, मराठीबाणा सोडला आणि आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्टिट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

    हिंदुत्व, मराठी बाणा देखील सोडला

    भाजपच्या मुख्य प्रवक्त्यांनी व्टिट करून महाविकास आघाडीसोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, तसेच मराठी बाणा देखील सोडला आहे आणि आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडल्याची टीका केली आहे. कारण उड्डाणपुलाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐवजी ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याचा आग्रह शिवसेना खासदार शेवाळे यानी केला आहे. अण्णाभाऊ साठे हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आवाज होते, त्यांचे नाव देण्याचा निर्णय पूर्वी झाला असताना ख्वाज गरीब नवाज यांचे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना आहे, याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले आहे.

    खासदार शेवाळे यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

    घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे नवा उड्डाणपूल निर्माण होत असून या पुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद मोईनुद्दीन चिश्ती- अजमेर (गरीब नवाज) यांचे नाव देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. छेडानगर ते मानखुर्द असा हा उड्डाणपूल आहे. या पुलाचे नामकरण करण्याची मागणी तारीक उल्मा-ए-अहले सुन्नत या संस्थेने केल्याचे खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्रात म्हटले आहे.

    छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम धर्मियांची आहे, असे शेवाळे यांनी म्हटले आहे. या उड्डाणपुलास सुफी संत असलेले ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन समस्त मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

    स्थानिकांच्या भावनांचा अनादर नको

    असे असले तरी उपाध्ये यांनी व्टिट करत विश्व हिंदू परिषदेचे मागणीपत्र जोडले आहे. त्यात या उड्डाणपुलाला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कारण या परिसरात मातंग समाजाची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. ते लोकशाहीर अण्णाभाऊंचे अनुयायी आहेत. स्थानिकांच्या भावनांचा आदर करून या उड्डाणपुलाला अण्णाभाऊंचे नाव द्यावे अशी मागणी चेंबूर जिल्हा विश्व हिंदू परिषदेने केली आहे.