परप्रांतियांच्या विरुद्ध केलेले ‘ते’ वक्तव्य भाजपने हेरले; आमदार भातखळकरांची मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसात तक्रार

    मुंबई (Mumbai) : साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रातीयांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करत यापुढे परप्रांतीय कुठून येतात कुठे जातात यांचा हिशोब ठेवावा लागेल, असे वक्तव्य करून जणू परप्रांतीय नागरिकच बलात्कारी व गुन्हेगार असल्याचे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केला आहे. त्यामुळे कलम ‘१५३- अ’ अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, याला प्रसिद्धी देणाऱ्या सामना वर्तमानपत्राच्याच्या संपादिका रश्मी ठाकरे व सामन्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस स्टेशन मध्ये केली आहे.

    राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काम करण्याचे सोडून ठाकरे सरकार वसुली करण्यात मग्न आहे, राज्यात दिवसागणिक बलात्कार व महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होत असताना व ठाकरे सरकारमधील मंत्री व नेतेच बलात्कारी असतानासुद्धा मुख्यमंत्री मात्र परप्रांतीय नागरिकांना लक्ष करीत आहेत.

    शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नगरसेवक नामदेव भगत, शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने, नालासोपाऱ्याचा शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाले आहेत, हे सर्व शिवसेनेचे नेते परप्रांतीय आहेत का? असा सवाल आ. भातखळकर यांनी केला आहे.

    मागील सात महिन्यात एकट्या मुंबई शहरात ५५० महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, यात तब्बल ३२३ अल्पवयीन मुलीसुद्धा आहेत. यातील किती आरोपी परप्रांतीय आहेत याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा, असा सवालसुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केला आहे. पुढील चार दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी दिला आहे.