BJP's 33 crore tree planting campaign will be investigated; Establishment of a committee under the chairmanship of Minister of State for Forests Dattatraya Bharane

२०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन फडणवीस सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविली होती. त्यावर किती खर्च झाला व यातील किती झाडांचे संगोपन झाले यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

  मुंबई : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली. सदर समिती येत्या चार महिन्याच्या आत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही भरणे यांनी सांगितले.

  २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन फडणवीस सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविली होती. त्यावर किती खर्च झाला व यातील किती झाडांचे संगोपन झाले यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

  या मोहिमेअंतर्गत वन विभागाने २८ कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील सध्या ७५ टक्के रोपे जिवंत असून २५ टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने विधीमंडळात मान्य केले होते. राज्यातील अनेक भागातील वृक्ष नष्ट झाली असून, जी झाडे आहेत त्याची व्यवस्थित देखभाल व संगोपन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. वृक्ष लागवड मोहिमेवर २५०० कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती.

  चार महिन्यात अहवाल

  त्यावर मंत्री भरणे यांनी विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तर, चार किंवा सहा महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली होती. त्यानुसार, आता केवळ आठच दिवसात मंत्री भरणे यांनी विधीमंडळ सदस्यांची समिती स्थापन करून ही समिती चार महिन्याच्या आत सभागृहाला अहवाल सादर करेल, अशी घोषणा केली.

  सर्वपक्षीय १६ आमदारांची समिती

  वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली १६ विधानसभा सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मंत्री भरणे यांच्यासह नाना पटोले (काँग्रेस), सुनील प्रभू (शिवसेना), उदयसिंग राजपूत (शिवसेना), बालाजी किणीवर (शिवसेना), अशोक पवार (राष्ट्रवादी) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी), सुनील भुसारा (राष्ट्रवादी), शेखर निकम (राष्ट्रवादी), सुभाष धोटे (काँग्रेस), अमित झनक (काँग्रेस), संग्राम थोपटे (काँग्रेस), आशिष शेलार (भाजप), नितेश राणे (भाजप), अतुल भातखळकर (भाजप), समीर कुणावर (भाजप) आणि नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) आदी १६ विधानसभा सदस्यांचा समावेश आहे.