आदर पुनावाला धमकी प्रकरणी भाजपच्या आशिष शेलार यांनी दिला ‘हा’ इशारा

'पूनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्र सरकारने सुरक्षा पुरवत आपले काम चोख केले आहे - आशिष शेलार

    मुंबई: सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला धमकावले जात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणावरुन संताप व्यक्त करत ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावे , असा इशारा दिला आहे.

    ‘पूनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्र सरकारने सुरक्षा पुरवत आपले काम चोख केले आहे,’असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. करोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचे नाही. लोकांची सेवा करणे भाजपाने धोरण आखले आहे असेही ते म्हणाले.

    अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंदर्भात आपण भाष्य करु शकत नाही असे म्हटले आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचे नाव घेतले किंवा उत्तर दिले तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त केली.

    सध्या भारत ज्या करोना संकटामध्ये सापडला आहे त्यासाठी कोणाला दोषी ठरवता येईल अशा अर्थाचा प्रश्न पुनावाला यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “मी जर तुम्हाला योग्य उत्तर दिले किंवा उत्तर जरी दिले तर माझा शिरच्छेद केला जाईल. मी निवडणूक किंवा कुंभ मेळ्यासंदर्भात भाष्य करु शकत नाही. हा खूप संवेदनशील विषय आहे. मला वाटत नाही की परमेश्वरालाही परिस्थिती एवढी वाईट होईल याचा अंदाज बांधता आला असता,” असे पुनावाला म्हणाले.

    ‘देशातील अनेक बड्या व्यक्तींच्या दबाव टाकणाऱ्या फोन कॉल्समुळे आपल्या त्रास होतोय’, असंही पुनावाला या मुलाखतीमध्ये म्हणाले. कोविशिल्ड लशीसाठी आपल्याला देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांमध्ये काही प्रभावी व्यक्तींचे मला फोन येऊन गेले. ज्यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे, असा खुलासा पुनावाला यांनी केला.