भाजपचा आत्मनिश्वास वाढला; मुंबई महापालिका निवडणुकांबाबत राम कदम यांचे महत्त्वाचे वक्तव्य

मुंबई : हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. यानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास भाजपा नेते राम कदम यांनी व्यक्त केला. राम कदम यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बिहारमध्ये विजय मिळवला. त्यानंतर भाजपला हैदराबादमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं त्यावर देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय. लोकांनी विकासाला स्वीकारलं आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेवरदेखील भाजपचाच भगवा फडकणार,” असं राम कदम ट्विटमध्ये म्हणाले.

देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेससोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांना मोठा अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. असं असलंतरी राज्यात ते त्यांच्यासोबतच सरकार चालवत आहेत हा विरोधाभास असल्याचंही कदम म्हणाले. बराक ओबामा यांनीदेखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. काँग्रेसचे नेते केव्हा पर्यंत एका कुटुंबाच्याच मागे धावत राहणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.