मालाडमधील बाधितांच्या पुर्नवसनासाठी भाजपाचे धरणे आंदोलन

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या सुमारे १५० रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेने घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटीस दिल्या आहेत. मुळात कायद्यानुसार मसुदा परिशिष्ट-२ प्रथम प्रकाशित करावे लागते, त्यावर बाधित लोकांच्या सूचना-हरकती मागविल्यानंतर व त्यावर कारवाई करून अंतिम परिशिष्ट-२ तयार केले जाते व त्यातील पात्र लोकांना नियमानुसार सदनिकांचे वाटप केले जाते.

    मुंबई: कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील रहिवाशांचे गिरगाव पॅटर्नच्या आधारावर पुर्नवसन करावे अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूवर्चे आमदार अतुल भातखळकर यांनी मालाड येथे केलेल्या धरणे आंदोलनातून केली आहे. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. भातखळकर यांच्या आंदोलन करण्याच्या आक्रमक भूमिकेमुळे मनपा आणि एमएमआरडीएकडून सर्व नियम धाब्यावर बसवून होऊ घातलेली कारवाई रद्द करण्यात आली आहे.

    कुरार मेट्रो स्टेशनच्या कामात बाधित होणाऱ्या सुमारे १५० रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेने घरे रिकामे करण्यासंदर्भात नोटीस दिल्या आहेत. मुळात कायद्यानुसार मसुदा परिशिष्ट-२ प्रथम प्रकाशित करावे लागते, त्यावर बाधित लोकांच्या सूचना-हरकती मागविल्यानंतर व त्यावर कारवाई करून अंतिम परिशिष्ट-२ तयार केले जाते व त्यातील पात्र लोकांना नियमानुसार सदनिकांचे वाटप केले जाते.परंतु या प्रकरणात केवळ मसुदा परिशिष्ट-२ प्रसिद्ध झालेले असताना व ते सुद्धा मुंबई महानगर पालिकेने केलेले असताना नियमबाह्य पद्धतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बाधित नागरिकांना सदनिका वाटप करत आहे. इतकेच नव्हे तर ५ जुलै पर्यंत न्यायालयाच्या परवानगी शिवाय कोणत्याही बाधितांना हटविण्यास मनाई असताना सुद्धा २४ तासांच्या आत घरे रिकामी न केल्यास जबरदस्ती घराबाहेर काढण्याची धमकी एमएमआरडीए व मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली होती, या विरोधात भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली व खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती.