BJP's 'Mission Bengal'; Special responsibility on Vinod Tawde

मुंबई : बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाने मास्टर प्लानच बनवल्याचे दिसत आहे. यासाठी ममतांच्या आमदारांची फोडाफोडीही सुरु आहे. भाजपचं ‘मिशन बंगाल’ मध्ये मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये पाच झोन तयार केले असून प्रत्येक झोनची जबाबदारी एका नेत्यावर सोपवण्यात आली आहे. त्रिपुरात डाव्या पक्षांची सत्ता उलथवून कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुनील देवधर यांच्याकडे हुगळी आणि मिदानपूर या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, विनोद तावडे यांच्याकडे नवद्वीप, विनोद सोनकर यांच्याकडे राड बंग तर केंद्रीय नेते हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये २९४ सदस्यांची विधानसभा आहे. २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल २१९ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ २३, डाव्यांना १९ आणि भाजपला १६ जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या १६ जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.