१२ बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना कधी पत्र लिहिणार? मोदींना लिहिलेल्या पत्रावरुन भाजपचा पवारांना सवाल

महाराष्ट्रात कोकणात वादळ व अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील?' असा खोचक सवाल केशव उपाध्ये यांनी केलाय.

    मुंबई : पोटावरील शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आता पवारांनी लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. त्यावरुन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांना टोला लगावलाय.

    ‘पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून… लॉकडाऊन मध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता थेट लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात.

    महाराष्ट्रात कोकणात वादळ व अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील?’ असा खोचक सवाल केशव उपाध्ये यांनी केलाय.

    मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार? 12 बलुतेदारांना मदत मिळाली नाही त्याची विचारणा करणारे पत्र राज्यसरकारला पवार साहेब कधी लिहीणार?’, असे प्रश्न विचारत उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.