मुंबईतील बीकेसी, मुलुंड, दहिसर कोविड सेंटरची होणार दुरुस्ती; १ जूनपर्यंत नवीन रुग्ण दाखल केले जाणार नाही

मुंबईत सध्या सहा कोविड सेंटर असून यात २३ हजार बेड आहेत. सध्या रुग्णांची संख्या घटल्याने बेड्सही रिकाम्या आहेत. त्यामुळे या तीन कोविड सेंटरची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे नवीन रुग्णांना १ जूनपर्यंत दाखल करून घेतले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

    मुंबई: तौक्ते वादळानंतर मुंबईतील बीकेसी, मुलुंड, दहीसर कोविड सेंटरचे दुरुस्तीचे काम पावसाळ्याआधी केले जाणार आहे. त्यामुळे १ जूनपर्यंत नवीन रुग्ण दाखल करून घेतले जाणार नसल्याची माहिती बिकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता राजेश ढेरे यांनी दिली.

    तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बिकेसी, मुलुंड व दहिसर या कोविड सेंटरमधील रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते. या चक्रीवादळानंतर पालिकेच्या उच्चसस्तरीय समितीने या तिन्ही केंद्रांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तौक्ते वादळानंतर या तिन्ही केंद्रावर नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात आलेले नाही. लवकरच पावसाळाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे पावसापूर्वी सेंटरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागणार आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे बिकेसी कोविड सेंटरमध्ये पाणी भरून नुकसान झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून या तीन कोविड सेंटरची पावसापूर्वी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.