वारंवार सांगुनही न उघडलेल्या नर्सिंग होमवर मुंबई महापालिका करणार कारवाई

मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांची सेवा अनेक ठिकाणी सुरू न झाल्याने 'नाॅन कोविड' रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेऊन जे

मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांची सेवा अनेक ठिकाणी सुरू न झाल्याने ‘नाॅन कोविड’ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेऊन जे खाजगी ‘नर्सिंग होम’ (शुश्रुषा गृह, पॉलीक्लिनिक इत्यादी) सुरू झालेले नसतील, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात दिले होते. त्यानंतर आज याबाबत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील १ हजार ४१६ खाजगी ‘नर्सिंग होम’ पैकी १ हजार ६८ (७५.४२ टक्के) एवढे खासगी नर्सिंग होम सुरू झाले आहेत. तर महापालिका क्षेत्रातील ९९ डायलिसिस सेंटर पैकी ८९ सुरू झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे आज देण्यात आली आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे ७५ टक्के खाजगी ‘नर्सिंग होम’ जरी चालू झाले असले,  तरी उर्वरित सुमारे २५ टक्के नर्सिंग होम अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊन देखील हे ‘नर्सिंग होम’ आपली सेवा सुरू करत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या खाजगी ‘नर्सिंग होम’ वर कारवाई करण्याची बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची इच्छा नाही. परंतु महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या सूचनांकडे ते सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे व त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे सदर ‘नर्सिंग होम’ चे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी व त्या अनुषंगाने सर्व संबंधितांना नोटीस द्याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आज सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत. या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक खाजगी दवाखाने देखील बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर सदर खाजगी दवाखान्यांवर देखील ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ (साथरोग कायदा १८९७) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला यापूर्वीच दिले आहेत.