कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीबाबतच्या आरोपानंतर मुंबई महापालिकेचा खुलासा

मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेने ८६२ कोरोना रुग्णांच्या मृत्युची माहिती लपवल्याच्या अत्यंत चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. जनतेच्या माहितीसाठी याबाबतची संपूर्ण

 मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेने ८६२ कोरोना रुग्णांच्या मृत्युची माहिती लपवल्याच्या अत्यंत चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. जनतेच्या माहितीसाठी याबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती मांडत मुंबई महापालिकेने खुलासा केला आहे.

 एका खासगी रुग्णालयाने ६ जून रोजी अचानक १७ मृत्यू जाहीर केले असता विद्यमान आयुक्तांनी त्याबाबत सखोल पडताळणी केली. तेव्हा त्यादिवशी केवळ १ मृत्यू झालेला असून इतर १६ मृत्यू हे पूर्वी जाहीर केले नसल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत अधिक विस्तृत माहिती घेण्यासाठी सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना ४८ तासांच्या आत अशा पूर्वीच्या मृत्युंबाबतची विनाविलंब व न चुकता सदर माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे (एपिड सेल) सादर करण्याचे सक्त आदेश ८ जून रोजी आयुक्तांनी जारी केले. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करुन विहीत वेळेत ही माहिती सर्व रुग्णालयांकडून उपलब्ध करुन घेण्यात आली. त्यामुळे वरील कारणांमुळे यापूर्वी जाहीर न केलेल्या एकूण ८६२ मृत्युंबाबतची माहिती महापालिकेने  १२.जून ते १५ जून दरम्यान महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे पहिल्यांदा प्राप्त झाल्यानंतर तात्काळ ते महाराष्ट्र शासनास खुलासेवार आकडेवारीसह अहवाल सादर करुन सदरची माहिती प्रसिद्ध करुन जाहीर करण्याबाबतची विनंती केली.

यात एक अत्यंत महत्त्वाची बाब समजून घेतली पाहिजे की, रुग्ण आणि मृत्युंबाबतच्या सर्व माहितीचे संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या एपिड सेलकडे ८ जूनपर्यंत ही माहिती पोहचलेली नव्हती एवढेच नाही तर साथरोग नियंत्रण कक्षाला याची कल्पनाही नव्हती. तसेच ८ तारखेला हे सर्व मृत्यु ४८ तासांच्या आत नोंदवा, असे सक्त आदेश विद्यमान आयुक्तांनी दिल्यानंतर ही माहिती एपिड सेलकडे यायला लागली. त्यामुळे ती माहिती लपविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खरे तर मनपाने स्वतःहून व प्रयत्नपूर्वक सर्व रुग्णालयांना सक्तीचे आदेश देवून व पाठपुरावा करुन  सर्व मृत्यूंची माहिती गोळा केली. ती शासनाला सादर करुन जनतेसमार आणलेली आहे. ही माहिती देण्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक व खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी हे अहोरात्र झटत आहेत. यातील अनेकजण त्या काळात बाधित झाल्यामुळे आणि दळणवळणाच्या साधनातील मर्यादेमुळे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे या नोंदी या यंत्रणांकडून होऊ शकल्या नाहीत, यात ती लपविण्याचा कुठेही हेतू नव्हता, ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. अर्थात, भविष्यात मात्र या सर्व यंत्रणांना सातत्याने सजग राहून ४८ तासात या माहितीची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
 
 काहींनी ही माहिती लपविण्याबद्दलीच साशंकता व्यक्त करण्याआधीच महापालिकेने ही माहिती गोळा करुन, त्याची खातरजमा करुन, त्यामधील चुका दुरुस्त करुन व माहितीचे समायोजन करुन ती शासनाला सादर केलेली होती. यात जनतेसमोर ही सर्व सत्यस्थिती पारदर्शक व स्वयंस्फूर्तीने आणण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. आहे. भविष्यातही राहील. याच प्रकारचे प्रयत्न विभाग स्तरावर सुद्धा करण्यात येत असून त्याबाबतही समायोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत. माहितीचे समायोजन करणे, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या माहितीचे समायोजन असेच वेळोवेळी करावे लागणार आहे, हे ही नम्रपणे नमूद करण्यात येत आहे.