मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी धारावी परिसरातील कोरोना केंद्रांची केली पाहणी

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जी/उत्तर विभागात विशेषत: धारावी परिसरातील कोरोना रुग्णांच्या संस्थात्मक अलगीकरण सुविधेसाठी करण्यात येत असलेल्या

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जी/उत्तर विभागात विशेषत: धारावी परिसरातील कोरोना रुग्णांच्या संस्थात्मक अलगीकरण सुविधेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची आज पाहणी केली. 

अँथनी डिसिल्वा स्कूल, भारत स्काऊटस्‌ ॲण्ड गाइडस्‌ सभागृह, माहिम निसर्गोद्यान, राजीव गांधी क्रीडा संकुल यासह विविध ठिकाणी केलेल्या व्यवस्थेची जयस्वाल यांनी पाहणी केली. अलगीकरणात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची विचारपूस करतानाच त्यांना मिळणारे जेवण, इतर सुविधा यांचे निरीक्षणदेखील केले. जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी या केंद्रांसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती सादर केली. या विभागामध्ये कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १) अंतर्गत ३ हजार ७४० खाटांच्या क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये माहिम निसर्गोद्यान समोरील ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर २०० खाटांच्या जम्बो फॅसिलीटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलिटीमध्ये प्रत्येक खाटावर ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असेल.  विभागात कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) अंतर्गत ६६७ खाटांची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सीसीसी १ आणि सीसीसी २ मिळून एकूण ४ हजार ४०७ खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर व वेग वाढवणे शक्य झाले आहे. 
महापालिका आयुक्त चहल यांनी धारावी परिसरात काही दिवसांपूर्वी भेट दिली असता संस्थात्मक अलगीकरण वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यास अनुसरुन ही कार्यवाही गतीने करण्यात येत आहे. या उपाययोजनांबद्दल अतिरिक्त आयुक्त  जयस्वाल यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णवाहिका उपलब्धता, रुग्णांची ने-आण, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता यासह विविध बाबींवर योग्य ते दिशानिर्देशदेखील दिले.