कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महापालिका आयुक्तांचा ‘एम पूर्व’ विभागाचा पायी पाहणी दौरा, महापालिका कर्मचाऱ्यांसह स्थानिकांशी संवाद

मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येची घनता अधिक असणाऱ्या व आव्हानात्मक परिसर असणाऱ्या विभाग क्षेत्रांमध्ये 'एम पूर्व' विभागाचा समावेश होतो. सुमारे ८ लाख ३२ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या

मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येची घनता अधिक असणाऱ्या व आव्हानात्मक परिसर असणाऱ्या विभाग क्षेत्रांमध्ये ‘एम पूर्व’ विभागाचा समावेश होतो. सुमारे ८ लाख ३२ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या एम पूर्व भागात प्रमुख्याने मानखुर्द – गोवंडी – शिवाजीनगर या परिसरांचा समावेश आहे. याच ‘एम पूर्व’ विभागाचा पाहणी दौरा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकताच केला आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्तांनी आपला  ‘प्रोटोकॉल’ बाजूला ठेवत आणि आपले कार्यालय वाहन न वापरता पायी चालत ३ किलोमीटर पेक्षा अधिक अंतराचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, परिमंडळ ५ चे सहआयुक्त भारत मराठे, पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशू द्विवेदी, विभागातील वैद्यकीय अधिकारी व इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आलेल्या पायी पाहणी दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्तांनी या परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक दुकानदारांची व्यापाऱ्यांशीदेखील संवाद साधला. तसेच महापालिका आयुक्तांनी एम पूर्व विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत मेडिकल दुकानांना भेट देऊन तेथील फार्मासिस्ट दुकानदारांशीही संवाद साधला. याच पायी पाहणी दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्तांनी परिसरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची परिस्थिती जाणून घेतली. तसेच या सार्वजनिक शौचालयांमध्ये नियमितपणे ‘सॅनिटायझेशन’ करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिका आयुक्तांनी आपल्या पाहणी दौरा दरम्यान कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या महापालिकेच्या विविध कर्मचाऱ्यांशी आवर्जून संवाद साधला. रविवार असूनही अव्याहतपणे नागरिकांच्या सेवासुविधेसाठी काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांनी त्यांचे मनोबल उंचावले.

‘एम पूर्व’ विभागाच्या पायी पाहणी दौऱ्यानंतर महापालिका आयुक्तांनी एम पूर्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेतली. या बैठकीदरम्यान विभाग स्तरावर काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे आपली जबाबदारी पूर्ण करावी, तसेच आपल्या विभागातील नागरी सेवा-सुविधा नागरिकांना अव्याहतपणे मिळतील याची सातत्याने दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. मात्र त्याचबरोबर सर्वच कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी. वैयक्तिक स्तरावर नियमितपणे स्वच्छता ठेवावी, नियमितपणे मुखावरण वापरावे, शारीरिक दुरीकरण पाळावे असेही आवर्जून सांगितले.