मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी देश व राज्याच्या तुलनेत कमी असल्याचा केंद्रीय समितीचा निष्कर्ष

मुंबई: कोरोना या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या वाढीचा वेग बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र शासनाद्वारे नियुक्त केलेल्या समितीने काढला आहे. या

मुंबई: कोरोना या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या वाढीचा वेग बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र शासनाद्वारे नियुक्त केलेल्या समितीने काढला आहे. या निष्कर्षांनुसार १७ ते २७ एप्रिल दरम्यान रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे. जो यापूर्वी ८.३ दिवस असा होता. देशाच्या पातळीवर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा ९.५ दिवस एवढा आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर हा कालावधी ८.९ दिवस इतका आहे. ही बाब आवर्जून नोंदवत केंद्रीय समितीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. 

केंद्रीय समितीने आपल्या निष्कर्षांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करून त्याआधारे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी ४.३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी ३.९ रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी ६.३ टक्के एवढा होता. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास अटकाव व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ११ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला. महापालिका क्षेत्रात या आजाराचे रुग्ण सापडायला सुरूवात झाल्यापासून महापालिकेने रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली. परिणामी २६ एप्रिल पर्यंत तब्बल १ लाख २९ हजार ४७७ रूग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आले. यातील २१ हजार ५३ हे हाय रिस्क गटातील संपर्क होते.  यातून १ हजार ६४७ रूग्ण शोधता आले. ‘कोरोना कोविड १९’ चा प्रसार होऊ नये, म्हणून या रुग्णांच्या संपर्कातील लोकांपैकी ज्यांच्या घरी व्यवस्था होऊ शकते, अशा रुग्णांच्या बाबत घरच्याघरी विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व पाठपुरावा देखील सातत्याने करण्यात आला. तर ज्यांच्या बाबत घरच्या-घरी विलगीकरण करणे आव्हानात्मक आहे, अशा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवले. शिवाय रूग्ण एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ नये, यासाठी  कंटेनमेंट झोन तयार केले.बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने रूग्णांच्या जास्तीत जास्त वैद्यकीय चाचण्या करण्यावर भर दिला. यातून रूग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.  देशभरातील वैद्यकीय चाचण्यांच्या आकडेवारीचेेे विश्लेषण केल्यास लक्षात येते की, तुलनात्मक विचार करता देशभरात सर्वाधिक वैद्यकीय चाचण्या याााा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाल्या आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत तब्बल ६६ हजार चाचण्या करण्यात आल्या असून याचे प्रतीदशलक्ष व्यक्ती प्रमाण ५ हजार ७१ एवढे आहे. तर तामिळनाडू, राजस्थान, नवी दिल्ली, केरळ  येथील हे प्रमाण अनुक्रमे २,६२४; १,२२०; ७९४ आणि ६८४ असे आहे.

आपण एवढ्यावरच थांबलो नाही. तर ‘कोरोना कोविड’ रूग्ण येण्याची वाट न पाहता पालिकेनेच ‘फिव्हर क्लिनीक्स’च्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रूग्णांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानुसार आतापर्यंत २०४ फिव्हर क्लिनीक्स मधून आपण २३८ ‘कोरोना’ रूग्ण शोधले आहेत. आतातर राज्य शासनाने नेमलेल्या सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार आपण झोपडपट्ट्यांमधील ‘कोमाॅर्बीडीटी’ असणाऱ्या ज्येष्ठांचा शोध घेऊन, करोना त्यांच्या पर्यंत पोहोचण्या अगोदरच आपण त्यांना प्रतिबंधात्मक उपचार देऊन सक्षम करीत आहोत. 
आज महापालिकेची समग्र यंत्रणा, पोलीस, शासनाचे विविध विभाग, मुंबईतील खासगी दवाखाने, विकासक अशा अनेकांच्या सक्रिय सहकार्याने कोरोना विरूध्दची ही लढाई लढण्यात येत आहे. यासर्वांमुळेच आज हे केंद्र शासनाच्या समितीचे सकारात्मक निरिक्षण समोर आले आहे. आपले प्रयत्न, अनेकांच्या सक्रिय सहकार्याने योग्य दिशेने सुरू आहेत. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी महापालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे.