मलटाक्यांची गळती रोखण्यासाठी मुंबई पालिका खरेदी करणार स्लज डिवॉटर वाहने, पावणे अकरा कोटींचा खर्च

मुंबई पालिका(BMC) दोन नवी स्लज डिवॉटर वाहने(Sludge dewater vehicle) विकत घेणार आहे. त्यासाठी चार वर्षाच्या देखभालीसह पालिका पावणे अकरा कोटी रुपये खर्च करणार आहे.

    मुंबई:मुंबईतील मल टाक्या लिकेज होणे आणि त्यातील मल रस्त्यावर येवून मुंबईकरांना त्रास होणे या घटना आता रोखल्या जाणार आहेत.मुंबई पालिका(BMC) दोन नवी स्लज डिवॉटर वाहने(Sludge dewater vehicle) विकत घेणार आहे. त्यासाठी चार वर्षाच्या देखभालीसह पालिका पावणे अकरा कोटी रुपये खर्च करणार आहे.

    मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मलवाहिन्यांचे जाळे नाही. मात्र शौचालय मलटाक्या बांधण्यात आल्या आहेत.अशा तब्बल लाखाहून अधिक मलटाक्या अस्तित्वात आहेत. पुर्वी या मलटाक्या कामगार साफ करायचे. मात्र,आता अशा मानवीय मैला सफाईला बंदी असल्याने महानगरपालिका गेल्या काही वर्षांपासून सेसपुल वाहनांच्या मदतीने मलटाक्या साफ केल्या जात होत्या. आता २७ पैकी सेसपुल २० वाहने कालबाह्य झाली आहेत.

    तसेच,या मलटाक्या चिंचोळ्या गल्यांमध्ये असल्याने तिथपर्यंत ही वाहने पोहचू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने तीन वर्षांपुर्वी दोन स्लज डिवॉटर वाहने खरेदी केली होती. त्यांचा चांगला परीणाम दिसत असल्याने आता दोन नवी वाहने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन नव्या वाहनांच्या खरेदीसाठी स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.

    पारंपारीक सेसपुल वाहनांच्या मदतीने दररोज जास्तीत जास्त दोन ते तीन मलटाक्या साफ करता येत होत्या. तर,स्लज डिवॉटरींग वाहनांच्या मदतीने दररोज सहा ते सात मलटाक्या साफ करता येऊ शकतात. या वाहनांची क्षमताही जास्त आहे. लांब पाईपच्या मदतीनेही टाकीची सफाई केली जाऊ शकते, असा दावा प्रशासनाने या प्रस्तावात केला आहे.या मशिनच्या मदतीने मलटाक्यांमधील मैलापाणी मोठ्या यंत्रात शोषून घेतले जाते. या यंत्रातच गाळ आणि पाणी वेगळे होते. टाकीत इतर काही कचरा, घाण असल्यास तीही उच्च दाबाने शोषून घेता येते असे म्हटले आहे.