कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती २९ जूनपर्यंत कळविण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश; अन्यथा होणार कारवाई

मुंबई : कोरोनाया संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जून २०२० रोजी काढण्यात आले

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जून २०२० रोजी काढण्यात आले होते. या अनुषंगाने ज्या रुग्णालयांनी ४८ तासांच्या आत महापालिकेकडे माहिती कळविलेली नाही, तसेच सदर माहिती त्यांच्या स्तरावर अद्यापही प्रलंबित आहे; अशा रुग्णालयांनी येत्या सोमवारी, म्हणजेच दिनांक २९ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही माहिती कळवावी लागेल असे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज दिले आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज आयोजित एका बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आयोजित या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, वैद्यकीय क्षेत्रातील जेष्ठ तज्ज्ञ मंडळी, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता व महापालिका सेवेतील डॉक्टर मंडळी यांच्यासह पालिकेचे अति वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत  कोरोना  या संसर्गजन्य आजाराशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान कोविड बाधेने दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची माहिती काही प्रकरणी खासगी रुग्णालयांद्वारे ४८ तासांच्या मुदतीत महापालिकेकडे कळविली नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता महापालिका आयुक्तांनी या प्रलंबित माहिती महापालिकेकडे येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक २९ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कळविण्याची अंतिम संधी दिली आहे. तसेच याबाबत वारंवार संधी देऊनही ही माहिती न कळवणाऱ्या रुग्णालयांवर यापुढे साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी नमूद केले. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये / उपचार केंद्रांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल असलेल्या कोविड बाधित रुग्णांना अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचार मिळावेत, याकरिता दर महिन्याला आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज लक्षात घेऊन टोसिलिझुमॅब, रेम्डेसिव्हिर यासारख्या आवश्यक त्या औषधांचा महिन्याभरासाठीचा अग्रीम व पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर संबंधित प्रक्रियेनुसार उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त महोदयांनी आजच्या बैठकीत दरम्यान महापालिका रुग्णालयांना दिले आहेत. याच अनुषंगाने आवश्यकतेनुसार संबंधित औषधे तयार करणाऱ्या उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून थेटपणे औषधांची उपलब्धता करून घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रक्रिया व कार्यवाही करण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले आहेत.