वस्तुस्थिती आधी समजुन घ्या, रुग्णालयांमधील प्रतिकूल परिणाम करणारे व्हिडिओ प्रसारित न करण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई: कोरोनाबाधित रुग्णांवर यथायोग्य उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय अक्षरश: दिवस-रात्र एक करून रुग्णसेवा करीत आहेत, असे असताना मूळ

मुंबई: कोरोनाबाधित रुग्णांवर यथायोग्य उपचार करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय अक्षरश: दिवस-रात्र एक करून रुग्णसेवा करीत आहेत, असे असताना मूळ कारणमीमांसा समजून न घेता रुग्णालयातील  रुग्ण व रुग्णालयातील मृतदेहांचे व्हिडिओ पुन्‍हा एकदा समाज माध्‍यमांवर प्रसारित होत असल्‍याचे आढळून येत आहे. या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे खुलासा करण्‍यात आला आहे.

महापालिकेने म्हटले आहे की, २६ मे रोजी केईएम रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांनी काही मुद्यांवरुन अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारले. तथापि, प्रशासनाच्‍या यशस्‍वी मध्‍यस्‍थीनंतर हे आंदोलन मागे घेण्‍यात आले. याच आंदोलन कालावधीदरम्‍यान रुग्‍णालयातील स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा संबंधित बाबींवर प्रतिकुल परिणाम होणे स्‍वाभाविक होते. मात्र, कामबंद आंदोलन मागे घेण्‍यात आल्‍यानंतर संबंधित कामगार व कर्मचाऱ्यांद्वारे रुग्‍णालयातील स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा अधिक प्रभावीपणे करण्‍यात आली. तसेच त्‍यानंतर निर्धारित वैद्यकीय कार्यवाही क्रमानुसार स्‍वच्‍छता व रुग्‍णसेवा नियमितपणे करण्‍यात येत आहे. मात्र  कामबंद आंदोलनादरम्‍यान काही प्रवृत्तींद्वारे या कालावधीतील परिस्थितीचे व्हिडिओचित्रण करुन ते समाज माध्‍यमांवर टाकण्‍यात आले. जे नंतर काही प्रमाणात व्‍हायरल झाले आहे. तसेच कामबंद आंदोलन काळातील हे व्हिडिओ चित्रण हे काही प्रसारमाध्‍यमांवरुन देखील प्रसारित करण्‍यात येत आहे. तथापि तेव्हिडिओचित्रण ही सध्‍याची वस्‍तुस्थिती नसल्‍याचे प्रशासनाद्वारे आवर्जून कळविण्‍यात येत आहे.

 केईएम रुग्‍णालयात अचानक उद्भवलेल्‍या आंदोलनादरम्‍यानच्‍या कालावधीतील व्हिडिओ प्रसारि‍त झाल्यामुळे केवळ वैद्यकीय कामगार – वैद्यकीय कर्मचारी  यांच्याच मनोबलावर नव्हे, तर रुग्‍णांच्‍या व त्यांच्या आप्‍तांच्‍या मनोबलावर देखील याचा मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्‍हा एकदा नम्र आवाहन करण्‍यात येत आहे की,  नागरिकांनी वस्‍तुस्थिती लक्षात घेऊन रुग्‍णालयातील सदर व्हिडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारित करणे टाळावे. त्‍याचबरोबर प्रसारमाध्‍यमांनीदेखील सदर व्हिडिओचित्रण प्रसारित करणे टाळावे, अशी नम्र विनंती यानिमित्ताने करण्‍यात येत आहे.