स्मशानभूमीची सद्यस्थिती कळण्यासाठी महापालिकेकडून डॅशबोर्ड होणार कार्यान्वित -‘१९१६’ क्रमांकावर मिळणार स्मशानभूमीची माहिती

मुंबई: मुंबईत महापालिकेच्या ४६ ठिकाणी पारंपारिक स्मशानभूमींसह विद्युत वा गॅस दाहिनी असणाऱ्या स्मशानभूमी आहेत. पारंपारिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चितास्थाने आहेत. तर

मुंबई:  मुंबईत महापालिकेच्या ४६ ठिकाणी पारंपारिक स्मशानभूमींसह विद्युत वा गॅस दाहिनी असणाऱ्या स्मशानभूमी आहेत. पारंपारिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चितास्थाने  आहेत. तर ११ ठिकाणी विद्युत वा गॅस दाहिनी असून तिथे १८ शवदाहिनी आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण २३७ चितास्थाने असून यांची एकत्रित कमाल क्षमता २४ तासात १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. महापालिकेच्या अखत्यारितील स्मशानभूमींची सद्यस्थिती कळावी, यासाठी स्मशानभूमींच्या सद्यस्थितीचा संगणकीय ‘डॅशबोर्ड’ विकसित करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हे काम महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने आणि पालिकेच्याच माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सहकार्याने सुरु असून या महिन्याच्या अखेरीस हा ‘डॅशबोर्ड’ कार्यान्वित होईल, ज्यामुळे स्मशानभूमींच्या सद्यस्थितीची माहिती ही पालिकेच्या नागरी सेवा सुविधा विषयक दूरध्वनी क्रमांक १९१६ यावर उपलब्ध होईल.

बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील स्मशानभूमींची सद्यस्थिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावी, या प्रमुख उद्देशाने बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे प्रत्येक स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या मृतदेहांची आकडेवारी आता नियमितपणे संगणकावर ‘अपडेट’ केली जाणार आहे. याच माहितीवर आधारित ऑनलाईन ‘डॅशबोर्ड’ तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून या महिना अखेरीस हा ‘डॅशबोर्ड’ कायान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. वरील तपशिलानुसार तयार करण्यात येणारा संगणकीय ‘डॅशबोर्ड’ महापालिकेच्या ‘१९१६’ या नागरी सेवा सुविधा विषयक दूरध्वनी क्रमांकास संलग्न करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यापूर्वी संबंधित आप्तांना स्मशानभूमींची सद्यस्थिती दूरध्वनीद्वारे सहजपणे कळू शकणार आहे.

आपल्या क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे स्मशानभूमी सेवा अव्याहतपणे २४ तास  उपलब्ध करुन देण्यात येते. या ठिकाणी येणाऱ्या मृत व्यक्तीच्या आप्तांची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, हात पाय धुण्यासाठी पाणी, शौचालय इत्यादी सेवा सुविधा देखील देण्यात येतात. तर पारंपारिक पद्धतीने दहन करण्यासाठी जळाऊ लाकडे देखील उपलब्ध करुन दिली जातात. या स्मशानभूमीतील वातावरण अधिकाधिक स्वच्छ रहावे, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. तसेच स्मशानभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा नियमितपणे मिळाव्यात, यासाठी सुयोग्य देखरेख परिरक्षणदेखील सातत्याने केले जाते. विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सदर संयंत्र काही कालावधीसाठी बंद ठेवले जाते. तर कधी आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ते बंद ठेवावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता एका विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये २४ तासात साधारणपणे ८ मृतदेहांवर अंत्य संस्कार होऊ शकतात. या प्रकारची १८ चितास्थाने महापालिका क्षेत्रात आहेत. हे लक्षात घेतल्यास विद्युत वा गॅस दाहिनीमध्ये चोवीस तासात साधारणपणे १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात.तसेच पारंपारिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरुन अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिका क्षेत्रात २१९ चितास्थाने आहेत. या प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता २४ तासात साधारणपणे ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. तर २१९ चितास्थानांची एकत्रित क्षमता ही २४ तासात साधारणपणे १ हजार ३१४ मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची आहे.

 बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील स्मशानभूमींची व तेथील चितास्थानांची एकत्रित सरासरी क्षमता ही २४ तासात सुमारे १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. तथापि, स्मशानभूमीतील संयंत्रांची देखभाल दुरुस्ती, इंधन गुणवत्ता, इतर आवश्यक ते परिरक्षण यासारख्या विविध बाबींवर ही क्षमता अवलंबून असते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच स्मशानभूमींच्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नागरिकांच्या सुविधेसाठी १९१६ या दूरध्वनी क्रमांकाशी संलग्न असा संगणकीय ‘डॅशबोर्ड’ महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सहकार्याने विकसित करण्यात येत आहे.