मुंबई महापालिकेच्या ‘१९१६’ या हेल्पलाईन नंबरवर मिळणार कोरोनाविषयक मदत आणि मार्गदर्शन

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘१९१६’ (वन नाईन वन सिक्स) या हेल्पलाईन क्रमांकावरच आता कोरोना विषयक हेल्पलाईन देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत ‘१९१६’ या

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘१९१६’ (वन नाईन वन सिक्स) या हेल्पलाईन क्रमांकावरच आता कोरोना विषयक हेल्पलाईन देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत ‘१९१६’ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर क्रमांक ‘३’ चा पर्याय निवडल्यास कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती दिली जाणार आहे. तसेच तो रुग्ण ज्या रुग्णालयात जाणार आहे, त्या रुग्णालयालादेखील रुग्णालयात दाखल होण्यासाठी येत असलेल्या रुग्णाची माहिती दिली जाणार आहे. या सुविधेमुळे कोरोनाबाधितांवर लवकरात लवकर उपचार सुरू करणे शक्य होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिली आहे. 

विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी असलेल्या खाटांपैकी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती सध्या नियमितपणे अद्ययावत केली जात आहे. तथापि, लवकरच ही माहिती ‘रियल टाईम’ पद्धतीनेदेखील अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. तसेच यासाठी ‘बुक माय शो’सारख्या खाजगी संस्थांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. १९१६ या महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून  ‘१’ नंबरचा पर्याय निवडल्यास कोरोनाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन संबंधितांना देण्यात येत आहे. या मार्गदर्शना दरम्यान डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय चाचणी गरजेची आहे असे वाटल्यास, त्यांना त्यांच्या घराजवळच्या वैद्यकीय प्रयोगशाळेचा संपर्क क्रमांक देण्यात येत आहे. तर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण गरजेचे आहे, असे डॉक्टरांना वाटल्यास त्यानुसार योग्य ते मार्गदर्शन संबंधितांना दूरध्वनीद्वारे देण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना रुग्णवाहिकेची गरज आहे, त्यांनी ‘१९१६’ या क्रमांकावर संपर्क साधून नंबर ‘२’ असा पर्याय निवडल्यास अशा व्यक्तींबाबत रुग्णवाहिका विषयक दूरध्वनी क्रमांकाशी समन्वय साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. कोरोना संबंधित बाबींव्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित नागरी सेवा सुविधा विषयक बाबींसाठी ‘१९१६’ या क्रमांकावर संपर्क साधून नंबर ‘४’ हा क्रमांक निवडावयाचा आहे; अशीही माहिती  नार्वेकर यांनी दिली आहे.