BMC

मुसळधार पावसात(Rain In Mumbai) मुंबईत पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

  मुंबई: ताैक्ते वादळापाठाेपाठ(Tauktae Cyclone) मुंबईत आता पावसाला सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसात(Rain In Mumbai) मुंबईत पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

  पाणी तुंबणाऱ्या २७० ठिकाणी पाणी खेचण्यासाठी पंप लावण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारे पाणी तुंबून मुंबई ठप्प होवू नये, यासाठी पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेचा मुंबईच्या विविध भागावर वाॅच असणार आहे.

  दरवर्षी मुंबईतील सखल भागात पाणी तुंबते. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूकीचा खोळंबा होतो. ही परिस्थिती यंदा निर्माण होवू नये म्हणून पालिका कामाला लागली आहे. आपत्ती कालावधीमध्ये १९१६ या हेल्पलाईनच्या माध्यमातून पालिका मदतीचा हात देण्यास तत्पर झाली आहे. शहर व उपनगरातील २३८ ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तात्काळ नोंद घेतली जाईल.

  पालिकेच्या नियंत्रण कक्षातील दुरध्वनी यंत्रणा कोलमडल्यास उपाययोजना म्हणून हॅम रेडिओ उपलब्ध करण्यात येणार आहे. संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची संयुक्त रेकी करण्याचे निर्देश ही आयुक्तांनी आपत्कालीन विभागाला दिल्या आहेत. ही रेकी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई अग्निशमन दल, नौदल, भू दल (थलसेना) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांच्या संयुक्तपणे केली जाणार आहेत.

  पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे. मुंबईत पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी सुरु असलेली कामे अंतिम टप्प्यात आहेत. गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणात साचेल या दृष्टीने काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.

  - किशाेरी पेडणेकर , महापाैर

  मुसळधार पावसात झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडतात. यात जीवित हानी होते, यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी करण्यात आली आहे.

  वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता तसेच आपत्तीमुळे बेघर होणाऱ्या नागरिकांना तात्पुरता आश्रय मिळावा यासाठी प्रत्येक विभागातील महापालिकेच्या काही शाळांमध्ये निवारे उपलब्ध केले जाणार आहेत.

  कुलाबा वेधशाळेकडून अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यास आणिबाणी परिस्थितीबाबत नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यासाठी भ्रमणध्वनी कंपन्यांच्या माध्यमातून लघुसंदेश पाठविण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. हवामानाचा अंदाज, भरती ओहोटीच्या वेळा, लांटाची उंची अशा परिस्थितीत काय करावे व काय करू नये याबाबतची माहिती दुरचित्र वाहिन्यांच्यामाध्यमातून तात्काळ दिली जाणार आहे.