अखेर मुंबई महापालिकेला आली जाग – बोगस लसीकरण टाळण्यासाठी केली नियमावली जाहीर, नोंदणी झालेल्या केंद्रावरूनच होणार लसीकरण

खासगी सोसायटींना आणि आस्थापनांना नोंदणीकृत लसीकरण केंद्राकडून लसीकरण(Vaccination From Registered Center) करावे लागणार आहे. याची नोंद केंद्र सरकारच्या कोविन ॲपवर करावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

  मुंबई: मुंबईत(Mumbai) कांदिवली येथे व त्यानंतर इतर ठिकाणीही बोगस लसीकरण(Bogus Vaccination) झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने नियमावली तयार केली आहे. खासगी सोसायटींना आणि आस्थापनांना नोंदणीकृत लसीकरण केंद्राकडून लसीकरण करावे लागणार आहे. याची नोंद केंद्र सरकारच्या कोविन ॲपवर करावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

  याबाबतचे परिपत्रक पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल(Iqbalsingh Chahal) यांनी काढले आहे. तसेच अशा लसीकरण केंद्रांवर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

  मुंबईतील कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीतील ३९० लोकांचे बोगस लसीकरण झाले होते. असाच प्रकार इतर ठिकाणीही झाला असून २ हजाराहून जास्त नागरिकांचे बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर पालिकेने बोगस लसीकरणाचे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी खासगी सोसायटी आणि आस्थापनांना पालिका व केंद्र सरकारकडे नोंद असलेल्या खासगी लसीकरण केंद्राकडूनच लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करण्याआधी संबंधित केंद्र नोंदणीकृत असल्याची माहिती खासगी आस्थापनांमधील व्यवस्थापनाला तसेच सोसायटीतील सचिवांना पालिकेला द्यावी लागणार आहे. सोसायटीच्या सचिवांना आणि खासगी आस्थापनांना नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्याला लसीकरण करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच आयटी सेवा उपलब्ध करून द्यावी लागेल असे परिपत्रकात नमूद करण्यात आहे.

   नियमावलीत काय  ?

  • लसीकरणापूर्वी मुंबई महापालिकेच्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना आणि पोलीस स्टेशनला तीन दिवस आधी माहिती देणे आवश्यक.
  •  रजिस्टर्ड खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरद्वारेच लसीकरण मोहीम राबवावी.
   कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर कोविन पोर्टलवर रजिस्टर आहे की नाही हे पाहावे.
  •  सोसायटीने सेक्रेटरीची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करावी.
  • लसीची किंमत, तारीख, खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती जाहीर करणे बंधनकारक.
  • आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरणाच्यावेळी अचानक भेट द्यावी.
  • लसीकरणादरम्यान काही गडबड आढळल्यास आरोग्य अधिकाऱ्यांनी किंवा नोडल ऑफिसरने तात्काळ पोलिसांना किंवा वॉर रूमला कळवावे.
  • लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची प्रत्येकाला लिंक उपलब्ध होईल याची नोडल ऑफिसरने खबरदारी घ्यावी.

  आरोग्य अधिकारी करणार तपासणी
  खासगी आस्थापना तसेच सोसायटीमध्ये लसीकरण करताना देण्यात आलेल्या माहितीची वॉर्डमधील आरोग्य अधिकाऱ्यांना तपासणी करावी लागणार आहे. लसीकरण केंद्र आणि सोसायटीमध्ये करार झाला आहे का याची तपासणी होणार आहे. तसेच खासगी ठिकाणी होणाऱ्या लसीकरणाच्या ठिकाणी पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी भेटी देऊन तपासणी करणार आहेत असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.