आधारकार्ड आणि निवारा नसलेल्यांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील, महापौरांनी दिली ‘ही’ माहिती

कोरोना प्रसार नियंत्रणात(corona spread control in mumbai) आणण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Statement)यांनी दिली आहे.

    मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Statement)यांनी दिली आहे.

    महापौर म्हणाल्या की, “फेरीवाल्यांची नोंदणी झाली आहे. फेरीवाल्यांचे झोन तयार करताना ती नोंदणी केलेली आहे. त्यामुळे त्यांना मदत करता येईल.”

    “जैन मुनी आहेत, त्यांच्याकडे आधार कार्डचं नाही, त्याचबरोबर बेघर असलेल्यांचं लसीकरण कसं करणार? तसेच काही काळासाठी आलेले आहेत, पण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही, अशा घटकांचा विचार होणं आवश्यक आहे आणि त्यांचा विचार महापालिका करत आहे. त्यांची नोंदणी करण्यासंदर्भात विचार केला जात आहे. स्थलांतरित मजुरांची माहिती आहे, त्यातून कार्यवाही केली जाईल. कारण ते लसीकरणापासून वंचित राहिले, तर कोरोना पुन्हा वाढत राहिलं,”असं महापौरांनी म्हटलं आहे.

    त्या पुढे म्हणाल्या, “महापालिका लहान मुलांसाठी वॉर्ड तयार करण्यासाठी जागा शोधत आहे. लहान मुलांसाठी पाळणाघर तयार करण्याचाही प्रयत्न आहे. दिव्यागांना घरात ठेवणं घातक ठरू शकतं. त्यामुळे या सगळ्यांचा विचार केला जात आहे. जागांचा शोध सुरू आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.”

    महापौर म्हणाल्या, “४५ वर्षापुढील व्यक्ती आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात अशी ५९ केंद्र आहेत. याची प्रत्येक वॉर्डला माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डच्या बाहेर या लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. वॉर रुममध्येही चालू असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती मिळेल.”